(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Subramanian Swamy : पंढरपूरच्या माऊली कॉरिडॉरच्या विरोधात डॉ. सुब्रमण्यम स्वामी मैदानात, थेट न्यायालयात जाण्याचा इशारा
पंढरपूरच्या माऊली कॉरिडॉरबाबत प्रथम राज्य सरकारशी बोलू. मात्र, त्यांनी न ऐकल्यास थेट न्यायालयातून हा कॉरिडॉर रद्द करायला लावू अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी घेतली आहे.
Subramanian Swamy : पंढरपूर येथील माऊली कॉरिडॉरच्या (Pandharpur Mauli Corridor) लढ्यात आता माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) उतरले आहेत. विठ्ठल मंदिर (vitthal mandir) परिसरात अनेक पुरातन मंदिरे, वारकरी संप्रदायाच्या प्राचीन श्रद्धा असणारे वाडे आणि इतर वास्तू आहेत. त्या उध्वस्त करून कॉरिडॉर बनवण्यात येणार असल्यानं, याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू असा इशारा सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे. आज सकाळी वारकरी संप्रदायाचे प्रमुख पदाधिकारी आणि नागरिकांनी मुंबईतील यंशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. स्वामी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रथम राज्य सरकारशी बोलू, न ऐकल्यास थेट न्यायालयातून रद्द करु
ज्या पद्धतीने काशीत देखील पुरातन मंदिरे पडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत कॉरिडॉर केला, त्यावरून त्यांच्या मानसिकता काय असल्याचे स्वामी म्हणाले. माऊली कॉरिडॉरला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. हा कॉरिडॉर कोणालाच नको असल्याच्या भावना नागरिकांना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावेळी स्वामी यांनी प्रथम राज्य सरकारशी बोलू. मात्र, त्यांनी न ऐकल्यास थेट न्यायालयातून हा कॉरिडॉर रद्द करायला लावू अशी ठाम भूमिका स्वामी यांनी घेतली आहे.
लवकरचं सुब्रमण्यम स्वामी पंढरपुरात येणार
दरम्यान, यापूर्वी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या कॉरिडॉर विरोधात ट्विट करताना रावणासारखे मोदी स्वतःला धार्मिक असल्याचा दावा करत वाराणशी, उत्तराखंडमध्ये मंदिरे पाडत आहेत. आता पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्याची फडणवीस यांच्यासोबत योजन आखात आहेत. त्यामुळं हे थांबवण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्य न्यायालयात धाव घेणार असल्याच्या तीव्र भावना सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केल्या. एकंदर माउली कॉरिडॉरला सर्वच पक्षांचा विरोध आहे. आता याच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी पुढे आहेत. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारला यावर विचार करावा लागणार आहे. लवकरच सुब्रमण्यम स्वामी पंढरपूर येथे येऊन विठूरायाची पूजा करणार असून कॉरिडॉर प्रकरणाची सर्व माहिती घेणार आहेत.
नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार
विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माऊली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा असून मंदिर परिसरातील रस्ते थेट 200 फुटापर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे . सध्या मंदिर परिसरात केवळ 60 फुटांचे रस्ते असून अजून जवळपास 140 फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: