रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतलेल्या पोलिसांचं निलंबन मागे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जनसंपर्क कार्यलयाची झडती घेतली होती. या प्रकरणी दानवेंच्या तक्रारीनंतर दोन फौजदारांसह पाच पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं. परंतु आता या पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती घेणाऱ्या पोलिसांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी त्या संबंधित आदेश काढले असून सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तिडके आणि शाबान जलाल तडवी अशी निलंबन मागे झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
11 जून रोजी जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यलयाची झडती घेण्यात आली होती. एका पत्रकारला मारणाऱ्या आरोपीच्या शोधत पोलीस रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले होते. परंतु कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय संबंधित पोलिसांनी झाडाझडती केली तसंच यादरम्यान कार्यालयातील संचिका गहाळ झाली, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली होती.
जालन्यात रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती, दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित
ही तपासणी करुन नेमकं काय निष्पन्न झालं याचा खुलासाही रावसाहेब दानवे यांनी मागितला होता. या प्रकरणी चौकशी करुन पोलिसांचं वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचं असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 14 जून दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांना निलंबित केलं होतं.
यानंतर या प्रकरणी रावसाहेब दानवे यांचे विरोधक शिवसेना नेते अर्जुन खोत यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या कार्यालयीन चौकशीनंतर दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेऊन त्याच पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.