(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संशयास्पद कॉलनंतर राज्यभरातील रेल्वे स्थानकांवर 'हाय अलर्ट'; मेसेज पाठवणाऱ्याला गोव्यातून घेतलं ताब्यात
Railway News : शुक्रवारी दिवसभर संशयास्पद हालचाली करणारे, नाहक फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. शिवाय, रेल्वेतही पोलिसांनी गस्त घातली.
Railway News : मुंबई पोलिसांना (Mumbai Police) रेल्वेबाबत संशयास्पद कॉल आल्यानंतर राज्यभरातील रेल्वे स्थानकांवर (Railway Station) 'हाय अलर्ट' घोषित करण्यात आला. त्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) राज्यभरातील रेल्वे स्थानकांवरदेखील रेल्वे पोलीस (Railway Police) व लोहमार्ग पोलिसांनी कडेकोट तपासणी करुन दिवसभर गस्त पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना 'रेल्वे पॅक होगा, हम हमारा काम करेंगे' अशा आशयाचा मेसेज रात्री प्राप्त झाला होता. त्यानंतर मुंबईतील (Mumbai) सर्व रेल्वे स्थानकांवर पोलीस विभाग सक्रिय झाला होता. या अनुषंगाने राज्यभरात सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तर शुक्रवारी दिवसभर संशयास्पद हालचाली करणारे, नाहक फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. शिवाय, रेल्वेतही पोलिसांनी गस्त घातली. तसेच छत्रपती संभाजीनगर शहर रेल्वे स्थानकांवर कुठलाही संशयास्पद प्रकार नाही. अशा प्रकारची तपासणी, गस्त नियमित होते, असे सहाय्यक निरीक्षक गणेश दळवी यांनी माध्यमांना बोलताना स्पष्ट केले.
शुक्रवारी सकाळी नऊच्या आत रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट केले जाणार असल्याची धमकी समाजकंटकाने दिली होती. मात्र, स्फोट कुठे, कोणत्या गाडीत होणार, ते त्याने सांगितले नाही. त्यामुळे धमकीची माहिती कळताच मुंबईच नव्हे तर, अवधी राज्य पोलीस यंत्रणाच खडबडून जागी झाली. तर राज्यभरातील रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या रेल्वे स्थानकावर विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लोहमार्ग पोलीस स्वतः लक्ष ठेवून होते. रेल्वे स्थानकावर पोलिसांची गस्त पाहायला मिळत होती. सोबतच काही रेल्वेमध्ये देखील पोलिसांनी गस्त घातली.
नागपूर स्थानकांवर सशस्त्र बंदोबस्त
मुंबई पोलिसांना रेल्वेबाबत संशयास्पद कॉल आल्यानंतर राज्यभरातील रेल्वे स्थानकांवर 'हाय अलर्ट' घोषित करण्यात होते. दरम्यान नागपूर रेल्वे पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने मुख्य रेल्वेस्थानकासोबतच अजनी, इतवारी, कळमना आणि आजूबाजूच्याही रेल्वे स्थानकांवर सशस्त्र बंदोबस्त लावला. बॉम्बशोधक तसेच नाशिक पथक, श्वानांच्या मदतीने रेल्वे स्थानकांचा कोनाकोपरा पिंजून काढण्यात आला. मात्र कोणताही संशयास्पद प्रकार समोर आला नाही.
पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या...
दरम्यान धमकीचा मेसेज मिळताच मुंबई पोलिसांनी मोबाईल फोनवरुन आरोपीचा माग शोधला. तसेच धमकी देणारा हा गोव्यात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे शुक्रवारी भल्या सकाळी धमकी देणाऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: