Nawab Malik : मंत्री तुरुंगात, कर्मचारी मात्र एसीत... खात्याचे काम नसतानाही लाखोंचा खर्च?
नबाब मलिक यांच्याकडील कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. तरीही मालिकांच्या मंत्रालयातील कार्यालयात सरकारी कर्मचारी काम करत असल्याचं पाहायला मिळाले आहे.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे वळवण्यात आली आहेत. तरीही मलिकांच्या मंत्री कार्यालयावर सरकारी कर्मचारी, खासगी कर्मचारी एसीत बसून काम करत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्री कार्यालयावर होत असलेल्या खर्चावर नाराजी व्यक्त करण्यात आहे.
राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली. सध्या ते कुर्ला येथील खासगी रुग्णालयात न्यायालयाच्या परवानगीने उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत एका नातेवाईकाला राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तुरुंगात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा सरकारने राजीनामा घ्यावा यासाठी विरोधक सातत्याने मागणी करत आहेत. सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. मात्र, शरद पवार आणि राष्ट्रवादीने नवाब मलिक यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतलेला नाही.
नबाब मलिक यांच्याकडील कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपवला आहे. तरीही मालिकांच्या मंत्रालयातील कार्यालयात सरकारी कर्मचारी काम करत असल्याचं पाहायला मिळाले आहे. तसेच खासगी कर्मचारी व पीए देखील कार्यालयात येऊन काम करत असल्याची बाब समोर येत आहे . आता नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री आहेत तरीही हे सर्व चित्र का असा सवाल राजकीय अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार करत आहे
मालिकांच्या कार्यालयात काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची या संदर्भात संवाद साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. मात्र या सर्व परिस्थितीवर राजकीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार नाराजी व्यक्त करत आहेत. मालिकांच्या खात्याकडे काम नसतानाही नसतानाही लाईट, एसी , खाणं पिणं आणि इतर गोष्टींवर सरकारचा खर्च होतोय अशी बाबत मंत्रालयात गेल्यावर निदर्शनास येतेय. तर बंद असलेल्या मलिकांच्या कार्यालयावर खर्च का? त्यांच्या कार्यालयात असलेले कर्मचारी अद्याप का दुसऱ्या विभागात वळवले नाही? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय .