(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik MLC Election : चौथी टर्मही तांबे कुटुंबियांकडं, बहुचर्चित निवडणुकीत सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय
Nashik MLC Election : नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागला असून सत्यजित तांबे यांनी अखेर दणदणीत विजय मिळवला आहे.
Nashik MLC Election : नाशिक पदवीधर निवडणुकीचा (Nashik Graduate Constituency) निकाल लागला असून सत्यजित तांबे यांनी अखेर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून पुन्हा एकदा तांबे कुटुंबीयांकडे सत्यजीत तांबेंच्या रूपात चौथी टर्मही पाहायला मिळणार आहे.
राज्यातील पाच शिक्षक पदवीधर मतदारसंघांचा निकाल लागला असून या सर्वांमध्ये नाशिकच्या (Nashik) पदवीधर निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे (satyajeet Tambe) विजयी झाले असून सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील (shubhangi Patil) यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.
सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेंमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. सुरवातीपासून चर्चेत असलेली नाशिक पदवीधर निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. युवा नेतुत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजित तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत. जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदार संघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजित तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.
साधारण सकाळी आठ वाजेपासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली होती. त्यानंतर सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर, मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाली. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांना सत्यजीत तांबे याना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली असून 14 हजार 693 मतांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरी अखेर 50 हजार 555 मते वैध ठरविण्यात आली. तर 5 हजार 445 अवैध मते ठरविण्यात आली. यात सत्यजित सुधीर तांबे यांना 31 हजार 009 मते पडली. शुभांगी भास्कर पाटील यांना 16 हजार 316 मते पडली.
नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर एकूण 84 हजार मतांची मोजणी करण्यात आली. यात 75 हजार 622 मते वैध ठरविण्यात आली तर 8 हजार 378 अवैध ठरविण्यात आली. यात सत्यजीत तांबे यांना जवळपास 45 हजार 607 मते पडली आहेत तर शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मते पडली आहेत. त्यामुळे अद्यापही शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. तर चौथ्या फेरीत 1 लाख 760 मतांची मोजणी करण्यात आली. सत्यजित सुधीर तांबे 60 हजार 161 मते पडली तर शुभांगी भास्कर पाटील 33 हजार 776 मते पडली. तर अंतिम फेरीत सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मते तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 इतकी मते पडली. त्यानुसार सत्यजित तांबे यांचा 29 हजार 465 मतांनी विजय झाला. या निवडणुकीत एकूण बाद मते 12 हजार 997 मते निघाली.
नाशिक पदवीधरमध्ये 12 हजार अवैध मते
दरम्यान नाशिक पदवीधर निवडणुकीत यदां जवळपास 49.32 टक्के मतदान झाले तर आजच्या निवडणूक निकालात पाच फेऱ्यानुसार मतमोजणी करण्यात आली. यात जवळपास एकूण 1 लाख 29 हजार 615 मतदानापैकी 12 हजार 297 मते अवैध ठरविण्यात आली. तर सरासरी 1 लाख 16 हजार 618 मते वैध ठरविण्यात आली. यात पहिल्या फेरीत 2741 मते अवैध, दुसऱ्या फेरीत 5 हजार 445 मते अवैध, तिसऱ्या फेरीत 8 हजार 378 मते अवैध, चौथ्या फेरीत 11 हजार 240 मते अवैध तर पाचव्या आणि शेवटच्या फेरीत जवळपास (पाच फेऱ्या मिळून) 12 हजार 297 मते अवैध ठरविण्यात आली. तर 58 हजार 310 मतांचा कोटा ठरविण्यात आला होता.