(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Air service : नाशिकच्या विमानसेवेसाठी काहीही! मंत्री भारती पवार यांचे वाहतूक मंत्रालयाला साकडे
Nashik Air service : नाशिकच्या (Nashik) विमानसेवेसाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.
Nashik Air service : उडान अंतर्गत सुरू असलेली अलायन्स एअरची (Alliance Air) केवळ पुणे-नाशिक-अहमदाबाद-दिल्ली सेवा बंद झाली आहे. मात्र स्पाईडजेटची नाशिक-हैदराबाद, नाशिक दिल्ली (Nashik Delhi), नाशिक-पुद्दुचेरी, नाशिक-तिरुपती ही सेवा पूर्वी सारखी सुरू असल्याने विमानसेवा बंद झाली असल्याचा चुकीचा संदेश पसरू नये असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सांगितले. बंद पडलेल्या कंपन्यांचे विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना साकडे घालण्यात आले असून त्यांनी उडाण अंतर्गत अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार असल्याचे कळवले असल्याचे पवार यांनी सांगितले.
उडान योजनेअंतर्गत नाशिक (Nashik) मधून सुरू असलेली विमानसेवा खंडित झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पवार म्हणाल्या केंद्राने उडाण योजनेत तीन वर्षांचा कालावधी ठरवून दिला होता. नाशिकमधून सेवा देणाऱ्या अलायन्स एअरलाईनची मुदत जानेवारी संपुष्टात आली. परंतु त्यानंतरही कंपनीने सेवा आतापर्यंत सुरूच ठेवली. मात्र व्यावसायिक उडाणासाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने काही सेवा बंद केल्या आहेत. नाशिक दिल्ली (Nashik-Delhi) हि सेवा सुरू असून पुढील वर्षांपर्यंत या सेवेची मुदत आहे. नाशिकमधून विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने उडानमधून मुदतवाढ मिळावी या करता केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. दरम्यान नाशिकमधून कोलकत्ता गोवा आणि भोपाळसाठी इंडिगो कंपनीने विमानसेवा सुरू करावी, याकरता प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
उडान योजना अंतर्गत फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2022 पर्यंत अलाइन एअरची विमानसेवा सुरू होती. त्यानंतर जानेवारीपासून उडाण अंतर्गत त्यांना मिळणारे गॅप फंडिंग बंद होऊनही त्यांनी ती सेवा ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू ठेवली होती. मात्र या कालावधीत पुणे नाशिक अहमदाबाद दिल्ली ही सेवा आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने ती बंद केल्याचे अलायन्स एअरने कळवले आहे. मात्र ही सेवा देखील पूर्ववत उडाणंतर्गत सुरू हवी. यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाशी आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री पवार यांनी दिली आहे.
नाशिक पुणे हायपस्पीडसाठी पुनःसर्वेक्षण
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प गुंडाळला जाण्याचे चर्चांना सध्या उधान आले आहे. या प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने महारेलला नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने भूसंपादन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु हा प्रकल्प रद्द झाला नसल्याचे डॉ. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पात वेग मर्यादा आणि काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तांत्रिक अडचणी दूर करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे सूचना करण्यात आल्याच्या बैठकीत सांगितले .