Nashik leopard : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली बिबट्याची धास्ती, कामावर जाण्यास नकार
Nashik leopard : नाशिक मनपाच्या (Nashik NMC) कर्मचाऱ्यांना बिबट्याची धास्ती वाटू लागली असून थेट कामावर जाण्यास कर्मचारी नकार देत आहेत.
Nashik leopard : एकीकडे नाशिक (Nashik) शहरात सद्यस्थितीत बिबट्याचा (Leopard) वावर कमी अधिक प्रमाणात असला तरी मात्र नागरिकांमध्ये धास्ती कायम आहे. आता नाशिक मनपाच्या (Nashik NMC) कर्मचाऱ्यांना बिबट्याची धास्ती वाटू लागली असून थेट कामावर जाण्यास कर्मचारी नकार देत आहेत. तर फटाके फोडून बिबट्याला पळविण्याच्या अजब सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे बिबट्याचा वावर वाढल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.
बिबट्याचे माहेरघर बनलेल्या नाशिक शहरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. कधी घरात,तर कधी दारात तर कधी झाडावर तर कधी बंगल्यावर असा फेरफटका मारणारा बिबट्या आता नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र व सातपूर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. नाशिक मनपाच्या संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसू लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे बिबट्याच्या भीतीने कर्मचारी कामावर जाण्यास नकार देत आहेत.
दरम्यान दोन्ही विभागाच्या परिसरात बिबट्या आढळून येत असल्याने कर्मचाऱ्यांची मनात धास्ती पसरली असल्याचे कमर्चाऱ्यांनी सांगितले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले असता त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही अद्याप संबंधित ठिकाणी पिंजरा लावण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर कर्मचारी कामावर जाण्यास नकार देत असल्याने अधिकाऱ्यांनी फटाके फोडून बिबट्याला पळवून लावण्याचा अजब सल्ला कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता बिबट्याच्या धास्तीने कामावर जावे कि नाही असा प्रश्न नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना पडला आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
नाशिक महापालिकेचे सातपूर परिसरात शिवाजीनगर भागातील वनविभागाच्या डोंगराला लागून भव्य जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या ठिकाणी जंगल परिसर असल्याने अनेकदा बिबट्याचा वावर दिसून येतो. परिसरात तुरळक वस्ती असल्याने नागरिकही धास्तावलेले आहेत. आणि आता कर्त्यव्यावर येणाऱ्या नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावण्याची मागणी कर्मचाऱ्यांसह विभागाने केली आहे. तर दुसरीकडे पिंपळगाव खांब परिसरात असलेल्या मलनि:सारण केंद्र परिसरातही बिबट्या आढळून आल्याने कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
वनविभागाचं म्हणणं काय?
नाशिकच्या सातपूर भागातही शिवाजीनगरचा परिसर हा जंगलव्याप्त असून या ठिकाणी सुला वाईन, फाशीचा डोंगर, विपश्यना केंद्र आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने साहजिकच या परिसरात नागरीकांच्या निदर्शनास बिबट्या येतो. जंगल परिसर असल्याने पिंजरा लावणे शक्य होणार नाही, त्यामुळे मनपा प्रशासनाने संबंधित ठिकाणी अधिक लाईट लावावेत, शिवाय फेंस वाढवून घेण्याचे आवाहन वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले. तसेच नाशिक मनपाच्या मल निस्सारण परिसरात पाहणी करून पिंजरा लावण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.