Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील 13 हजार हेक्टरवरील पिकांना फटका, 25 हजार 985 शेतकरी बाधित
Nashik Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे.
Nashik Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नाशिक जिल्ह्यातील (Nashik) शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. रविवारी (9 एप्रिल), सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे तर नुकसानात अधिकच भर पडली असून, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील 13 हजार 909 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 7 ते 9 एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून (Agri Department) शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 208 गावे बाधित तर 25 हजार 985 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसाच्या पावसाने एकूण 13 हजार 909 हेक्टरवरील शेतीपिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून 10 हजार 725 हेक्टरवरील कांद्याला फटका बसला आहे. कांद्या खालोखाल 792 हेक्टरवरील डाळिंब, 771 हेक्टरवरील द्राक्ष आणि 627 हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
नाशिकला अवकाळी पावसाचा मोठा फटका
राज्यात अवकाळी पावसाचा नाशिकला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्हाला अवकाळीचा फटका बसत आहे. या पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले तर शेतामध्ये काढून ठेवलेला कांदाही भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
25 हजार 985 शेतकऱ्यांना फटका
अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 208 गावामधील 25 हजार 985 शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. द्राक्ष बागांची काढणी सुरु असल्याने अनेक बागांना फटका बसला तर उन्हाळा कांद्याचे देखील नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. गतवर्षी खरीप आणि रब्बी हंगामानंतर अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले होते. यंदाही अवकाळीचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा चाळीचे गारपिटीमुळे नुकसान झाले तर अनेक तालुक्यांमध्ये गहू भिजला आहे. जवळपास 10 हजार 725 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे तर 227 हेक्टरवरील गहू पिकाला गारपिटीचा फटका बसला. 771 हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे तर 773 हेक्टरवरील डाळींब पिकानेही मान टाकली. जिल्ह्यातील जवळपास 6926 हेक्टरवरील बागायतीचे नुकसान झाले तर 1542 हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिकमध्ये
अवकाळी पावसाने बारा जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानाच्या प्राथमिक अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 13 हजार 909 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील नुकसानाचा आकडा 7 हजार 305 हेक्टर इतका आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वांत जास्त नुकसान झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नाशिकचा दौरा करत पाहणी केली. दरम्यान नुकसानाचा प्राथमिक अंदाज पाहिला असता मालेगाव तालुक्यात 23 बाधित गावे, सटाणा 33 गावे, नांदगाव 02 गावे, कळवण 03 गावे, देवळा 06 गावे, दिंडोरी 06 गावे, नाशिक 11 गावे, इगतपुरी 11 गावे, निफाड 21 गावे, सिन्नर 20 गावे, चांदवड 09 गावे, अशा एकूण 208 गावांमध्ये नुकसान झाले आहे.