(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Maharashtra Rain : आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात (Marathwada) पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
13 ते 15 एप्रिल दरम्यान गारपीट होण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र विद्रभात कुठेही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली नाही.
मार्च महिन्यात राज्यातील 28 जिल्ह्यांना अवकाळीसह गारपीटीचा फटका
दरम्यान, मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला. त्यामुळं शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून राज्य सरकारनं चार महसुली विभागांसाठी 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे. सोमवारी (10 एप्रिलला) याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे 2 लाख 25 हजार 147 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यातून आर्थिक मदत दिली जाणार आहे. 4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्चदरम्यान राज्यात हे नैसर्गिक संकट ओढवले होते. अजूनही ते संपलेले नाही. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यंदा प्रथमच 'अवेळी पाऊस' ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली होती. त्याआधारे सर्व महसूल विभागांकडून संबंधित भागात किती नुकसान झाले त्याची माहिती मागवण्यात आली होती.
मराठवाड्याला अवकाळीचा मोठा फटका
मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मोठा फटफटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही द्राक्षाच्या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात उभी पिकं आडवी झाली आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), हिंगोली (Hingoli) आणि बीड जिल्ह्यात (Beed District) गारांचा पाऊस झाला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: