Nashik News : आदिवासी समाजाचा तळतळाट होईपर्यंत अंत पाहू नका, मंत्री भारती पवार संतापल्या...
Nashik News : आम्ही निसर्ग पूजक आहोत. आदिवासी (Tribal community) समाजाचा तळतळाट होईपर्यंत अंत पाहू नका.
Nashik News : आदिवासी समाजाची परीक्षा घेऊ नका, आम्ही निसर्ग पूजक आहोत. आदिवासी (Tribal community) समाजाचा तळतळाट होईपर्यंत अंत पाहू नका. आदिवासी विकास विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवा असे प्रतिपादन केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री ना. डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी केले. सुरगाणा (Surgana) तालुक्यातील भोरमाळ येथे आयोजित केलेल्या संसदीय विकास परियोजनेत विकास कामांच्या आढावा बैठकीत केले.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. नाशिक जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. या आदिवासी लोकांपर्यंत योजना पोहचणे गरजेचे आहे. शिवाय दुसरीकडे देशाला महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत घेत आहेत. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी मिळून देशासाठी काम केले पाहिजे. देशात प्रथमच आदिवासींच्या नावावर इतिहास रचला गेला आहे. देशातील सर्वोच्चपदी आदिवासी भगिनी विराजमान झाली आहे. तसेच आठ आदिवासी समाजातील खासदारांना मंत्री पद मिळाले आहे.
त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधानांनी आता आदिवासी बाबतचे विचार बदलले आहेत. येत्या १५ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, राष्ट्रीय आदिवासी युवा दिन निमित्ताने जनजाती गौरव दिनाचे आयोजन भारतभर केले आहे. बोरगाव ते बर्डीपाडा या वासदा गुजरात राज्य महामार्गावर उमरेमाळ, तहसील कार्यालय, अंबाठा घाट या भागात मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवायला मुहूर्त शोधणार का? आताच्या आता काम सुरु करा. त्याशिवाय या रस्त्यावरुन प्रवास करता येणार नाही. याच खड्डय़ातून प्रवास करावा लागल्याने सबंधित बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांना पवारांनी चांगलेच खडसावले. पाऊस संपला असून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जनजीवन पाणीपुरवठा योजना, एकात्मिक बाल विकास योजना,रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री स्वावलंबन योजना, महिला बचतगट, शेत शिवार रस्ते, स्मशानभूमी शेड बांधकाम, पंतप्रधान आवास योजना, अतिवृष्टी मुळे नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे, संजय गांधी निराधार योजना यासह विविध योजनांचा आढावा घेतला. उंबरविहीर येथील जिल्हा परिषद शाळा इमारत उपलब्ध नाही अशी तक्रार पालकांनी केली, सडलेले पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली.
आदिवासी योजनांचे गौडबंगाल?
दरम्यान नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यातसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्याचबरोबर विविध योजना समाजाला लागू आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जाते. मात्र अनेकदा योजनांच्या नावाखाली अनेकदा गौडबंगाल होत असते. त्यामुळे योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होतो.