राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, पैशाची अफरातफर केल्याचा आरोप
सीबीआयनंतर आता ईडीनेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले होते.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे. कोलकात्यातील काही शेल कंपन्या अनिल देशमुखांच्या नातेवाईकांच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
हा गुन्हा दाखल करताना ईडीने अनिल देशमुख आणि इतर असा शब्द वापरला आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकरणात आणखी काही नावं आली तर त्यांचीही चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगण्यात येतंय.
सीबीआयकडूनही चौकशी सुरु
सीबीआयकडून काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला गेला होता. ज्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या जवळच्या एका नातेवाईकाचं संभाषण सीबीआयला दिलं होतं, ज्यामध्ये पोलिसांच्या बदल्या संदर्भातील संभाषण होतं. ज्यामुळे सीबीआय आता त्या संभाषणाची तपासणी करत असून या प्रकरणात पुढील तपास करत आहे. या संभाषणांमध्ये नेमकी ती व्यक्ती कोणाशी बोलत होती? कुठल्या बदल्यांसंदर्भात बोलत होती. या सगळ्यांची माहिती आता सीबीआयकडून गोळा केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या नातेवाईकांची चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :