गावकऱ्यांचा निर्धार आणि प्रशासनाची मदत, लॉकडाऊन काळात तलावाची निर्मिती
वाशिममधल्या पांगरी महादेव गावात युवकासह एका सामाजिक कार्यकर्त्यामुळे आणि प्रशासनाच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करुन तलावाची निर्मिती केली. यामुळे गावातील पाणी टंचाईवर मात होणार आहे.

वाशिम : 'गाव करी ते राव काय करी' या म्हणीची प्रचिती वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव या गावात पहायला मिळाली. या गावात एक नाही अनेक समस्या. गेल्या कित्येक दिवसांपासून या गावाच्या अनेक मागण्या मात्र तोडगा काही निघेना. शेवटी गावातील युवकासह एका सामाजिक कार्यकर्त्यामुळे आणि प्रशासनाच्या मदतीने लॉकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करुन तलावाची निर्मिती केली. या तलावामुळे गावात असलेली पाण्याची समस्या निकाली निघेल, अशा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव हे 800 लोकवस्तीचं गाव. सर्व शासकीय, प्रशासकीय योजनेपासून कोसो दूर असलेलं हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समस्या घेऊन लढा लढत होतं. या गावाला ना ग्रामपंचायत ना जिल्ह्यात गावाचा दर्जा. त्यामुळे शासकीय योजना या गावाच्या नशिबी कुठे? पांगरी महादेव गावात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची समस्या. शासन लक्ष देत नसल्याने गावातील विष्णू मंजुळकर आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन कुलकर्णी यांच्या मदतीने गावात ग्रामसभा घेऊन गावातील पडिक जमिनीवर भव्य तलाव साकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी मोठा पैसा लागणार होता. त्याकरिता वाशिमचे निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिगे यांच्या पुढाकारातून 100 बाय 100 मीटरच्या तलाव निर्मितीला सुरुवात झाली.
या तलाव निर्मितीच्या कामासाठी प्रशासनाकडून जेसीबी पुरवण्यात आला तर गावकऱ्यांनी श्रमदान आणि आर्थिक मदत करुन तलावातील सुपीक माती काढून शेती सुपीक केली. तर त्यातून निर्माण होणारं पाणी गावाच्या कामी आणण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. याकरता प्रशासनाने आणि इतरांच्या मदतीने जवळपास दहा लाख रुपये खर्च करुन भव्य तलाव निर्माण केला आहे. यामधून गावाची पाणी पातळी वाढवून दूषित पाण्यापासून दूर राहावं लागेल अशी आशा विष्णू मंजुळकर यांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्त्याच्या संकल्पनेतून, गावातील लोकांच्या एकजुटीने आणि प्रशासनाची मदत मिळाली तर गावातील कोणतंच विकासकाम थांबत नाही हे पांगरी महादेवसारख्या गावाने दाखवून दिलं आहे. या गावच्या एकजुटीतून निर्माण झालेला तलाव येत्या काही वर्षात या गावाबरोबर इतर गावांना जीवन जगण्याचा नवा विश्वास निर्माण करुन देणारा आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळाचा सकारात्मक उपयोग केला तर काहीही होऊ शकतं हे या माध्यमातून या गावातील नागरिकांनी दाखवून दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
