सांगलीतील पलुसमध्ये धक्कादायक प्रकार, कोरोनाबाधित रुग्णाची रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नेमणूक!
सांगलीतील पलुस तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाची रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने कामावर न येण्याच्या सूचना दिल्या असून ठेकेदाराविरोधात कारवाईची नोटीस काढण्यात आली.
सांगली : सांगलीतील पलुस तालुक्यात चक्क कोरोनाबाधित रुग्णाची रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नेमणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब निदर्शनास आणून देताच त्या कोरोनाबाधित चालकाला आरोग्य प्रशासनाने कामावर न येण्याच्या सूचना दिल्या. तसंच ज्या ठेकेदाराने त्याची नेमणूक केली त्याच्याविरोधात कारवाईची नोटीस काढण्यात आली आहे. ठेकेदाराची ही गंभीर चूक अनेकांच्या जीवाशी आली असती.
पलूस तालुक्यातील घोगाव गावातील संदीप पाटील यांनी हा प्रकार प्रशासनासमोर उघड केला. कोरोनाबधित असून देखील अशा पद्धतीने कामावर येणाऱ्या संबंधित चालकाला कामावर घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
धनंजय रामचंद्र पाटील असं या चालकाचं नाव असून 5 मे रोजी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने क्वॉरन्टीन राहणं अपेक्षित होतं. मात्र तरीही तो कामावर आला. दरम्यान त्याला ठेकेदाराने कामावर येण्यास सांगितलं की तो पॉझिटिव्ह असल्याचं लपवून तो स्वतःहून आला याची चौकशी होणं गरजेचं आहे.
या सगळ्या प्रकाराबाबत प्रशासनाला कोणतीही कल्पना नव्हती. संदीप पाटील यांनी ही गंभीर बाब प्रशासनाच्या नजरेत आणून दिल्यानंतर त्या चालकाला ताततीने घरी पाठवण्यात आलं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
याबाबत प्रशासनाने सांगितलं की, हा चालक 6 मे रोजी कामावर हजर झाला होता. त्याने एकाही रुग्णाची वाहतूक केलेली नाही. परंतु त्याने रुग्णवाहिकेतून औषधांचा पुरवठा केला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर चालकाला कामावर न येण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि ठेकेदाराविरोधात कारवाईची नोटीस काढण्यात आली आहे.
मात्र या प्रकारामुळे एका व्यक्तीची चूक कोरोना रुग्णसंख्या वाढवण्यास कारणीभूत ठरली असती. यामुळे आरोग्य यंत्रणेने अशा गोष्टी गंभीरपणे घेत पुन्हा अशी चूक होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.