(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : अब्दुल सत्तारांना ताकीद, सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील कारभारावर फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा
सरकारचे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. सदा सरवणकर प्रकरणामुळेही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.
मुंबई : आपल्या गटातल्या आमदारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे (CM Eknath Shinde) नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न पडला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावले आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले. यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. सदा सरवणकर प्रकरणामुळेही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.
30 जूनला एकनाथ शिंदे, देवंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. तेव्हापासून हे सरकार नको त्या घटनांमुळेच चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे, ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच सत्तारांनी माध्यमांकडे फोडली. यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांना दिली
आपल्याच मंत्र्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज
सदा सरवणकर यांच्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे तर शिंदे फडणवीसांची मोठी अडचण झाली आहे. आपनं गोळीबार केलाच नाही असा दावा करणाऱ्या सरवणकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. सरवणकरांच्या नगरसेवक मुलाचाही व्हिडिओ व्हायरल झाला. गोळीबार झाला त्या ठिकाणी पोलिसांना फायर झालेल्या बंदुकीच्या गोळीचा भाग मिळाला. त्यामुळे सरवणकरांचे पिस्तुल जप्त करून पोलिसांनी फॅरेन्सिकसाठी पाठवले आहे
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना सोडून 40 आमदार आले. 10 अपक्षांनी शिंदेना पाठिंबा दिला. आलेले सगळे आमदार सेनेतून पुन्हा सेनेतच आलेत असा दावा करत असले तरी उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फरक आहे. शिंदे कार्यकर्त्यांचे नेते आहेत. शिंदेंकडे आलेल्या प्रत्येकाला सत्तेत वाटा हवा आहे. अशा आमदारांवर नियंत्रण ठेवताना शिंदेंना मोठी कसरत करावी लागत आहेत. हे सरकार चालवण्यात भाजपाचाही कस लागणार आहे. नवं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील आमदारांच्या रोज काही ना काही तक्रारी कानावर येत आहेत. या सगळ्या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमाही मलीन होते. येणाऱ्या काही महिन्यात मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. एक प्रकारे महाराष्ट्रात मिनी विधानसभेचा आखाडा रंगेल. अशा पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा मलीन होणे यांना परवडणार नाही.