(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Rain : शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील आठवड्यात मराठवाड्यात पुन्हा पाऊस
Marathwada Rain News: मराठवाड्यात 14 मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Marathwada Rain News: या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची परिस्थिती असताना, आता पुन्हा एकदा पुढील आठवड्यात मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार, 13 मार्चला छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) , जालना (Jalna) जिल्ह्यात तर 14 मार्चला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यात 14 मार्चला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान केंद्राचा अंदाज!
दरम्यान, मराठवाड्यात 10 ते 16 मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच 17 ते 23 मार्चदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी, किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 15 ते 21 मार्चदरम्यान कमाल आणि किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान!
या आठवड्यात 5 ते 7 मार्चदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काढणीला आलेला गव्हाचं पीक अक्षरशः आडवं झालम आहे. सोबतच उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. अशात आता सरकराने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
नुकसानीचे पडसाद अधिवेशनात!
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विरोधकांनी अर्थसंकल्प अधिवेशनात आवाज उठवत, सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत नुकसानभरपाईची मागणी केली. सोबतच विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करून, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: