(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chatrapati Sambhajinagar: शहराचे नाव बदलले अन् आता पाट्याही; शिंदे गटाने दुकानावरील पाट्यांवर लिहिले 'छत्रपती संभाजीनगर'
Chatrapati Sambhajinagar: दुकानाच्या पाट्यांवरील औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.
Chatrapati Sambhajinagar: गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी होत होती. दरम्यान अखेर केंद्राने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांनी जल्लोष केला आहे. दरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेने शहरातील दुकानावर असलेल्या औरंगाबादच्या नावावर आता छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर लावले आहेत. तर प्रत्येक दुकानदारांनी दुकानाच्या पाट्यांवरील औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केले आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करताच शिंदे गटाच्या शिवसेनेने जल्लोष केला आहे. तर जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने शिवाजीनगर परिसरातील ज्या-ज्या दुकानावर औरंगाबाद नाव लिहिले आहे, त्या दुकानावरील पाट्या काढून छत्रपती संभाजीनगर असे पोस्टर चिटकवण्यात येत आहे. औरंगजेबाची आठवण असलेले औरंगाबाद नाव काढून आता छत्रपती संभाजीनगर नाव लावत असल्याचे जंजाळ म्हणाले. तर या निर्णयाला विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांना संभाजी महाराजांवरील पुस्तक भेट देणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी जंजाळ यांनी दिली आहे.
ठाकरे गटासह मनसेकडून जल्लोष...
शहराच्या नामांतराची घोषणा होताच, आज शनिवारी सकाळपासूनच टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला. सोबतच फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर त्याच ठिकाणी काही वेळेने मनसेने देखील जल्लोष साजरा केला. यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भगवे फेटे घालून संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुतळास्थळी घोषणाबाजी करत जल्लोष केला. त्यानंतर त्यांनी ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत आणि मोतीचूरचे लाडू एकमेकांना भरवत आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
जलील यांचा विरोध!
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. नाव बदलल्याने शहराचा विकास होणार आहे का? असा त्यांनी सवाल उपस्थित केला. तर या निर्णयाच्या विरोधात मोठा लढा उभा करणार असून, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील जलील यांनी दिला आहे. तर औरंगाबादमध्ये होणाऱ्या जी 20 परिषदेच्या दरम्यान आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: