Gram Panchayat Election: 'या' ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागणार
Aurangabad : ज्या बिडकीन गावात आदित्य ठाकरे यांची रॅली निघाली त्याच बिडकीन गावात 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली होती.
Gram Panchayat Election: गावचं मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचातीच्या निवडणुका 18 डिसेंबरला पार पडणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर औरंगाबादमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. दरम्यान 23 जुलैला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादच्या बिडकीन गावात (Bidkin Village) शिव संवाद यात्रा काढत रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघात देखील शक्तिप्रदर्शन केले होते. त्यावेळी त्यांच्या रॅलीला झालेल्या गर्दीची राज्यभरात चर्चा झाली होती. दरम्यान ज्या बिडकीन गावात आदित्य यांची रॅली निघाली त्याच बिडकीन गावात 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली.
तोच गाव, तोच ठिकाण...
विशेष म्हणजे बिडकीन गावातील ज्या निलजगाव फाट्यापासून आदित्य यांची रॅली निघाली होती, तेथूनच शिंदे यांची देखील रॅली निघाली होती. ज्याप्रमाणे आदित्य यांच्या शिव संवाद यात्रेला गर्दी झाली तशीच गर्दी एकनाथ शिंदे यांच्या रॅलीला झाली होती. दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे बिडकीन गावाची मोठी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली गेलेल्या ठिकाणी ठाकरे गटाने गोमूत्र शिंपून स्वच्छता केल्याने या गावाची अधिकच चर्चा झाली होती. आता त्याच बिडकीन गावात 18 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणूक होणार असून, शिंदे-ठाकरे गट आमने-सामने असणार आहे.
शिंदे-ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागणार...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी बिडकीन गावात केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर पहिल्यांदाच याठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटाची ताकद या गावात पाहायला मिळते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर दोन्ही गटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारतो आणि कुणाची रॅली यशस्वी ठरते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सोशल मीडियावर विरोधात पोस्ट, भूमरेंची तरुणाला फोनवरून धमकी? पोलिसात तक्रार दाखल