सोशल मीडियावर विरोधात पोस्ट, भूमरेंची तरुणाला फोनवरून धमकी? पोलिसात तक्रार दाखल
युवराजने तक्रारीत म्हटले आहे की, मंत्री संदिपान भुमरे यांनी आज माझ्या व्हॉट्सअपवर फोन करून काही कारण नसताना मला धमकी दिली. माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का केली, म्हणत शिवीगाळ केली.
Cabinet Minister Sandipanrao Bhumre : शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला व्हाट्सअपवरून फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. युवराज चावरे असे तक्रार देणाऱ्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी युवराजने औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
युवराजने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंत्री संदिपान भुमरे यांनी आज माझ्या व्हॉट्सअपवर फोन करून काही कारण नसताना मला धमकी दिली. माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का केली, म्हणत शिवीगाळ केली. तसेच पाचोड गावात आल्यावर तुला दाखवतो, नाहीतर तुझ्या घरी पोरं पाठवून मारायला लावतो अशी धमकी दिली. तसेच पोलिसात खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्याची धमकी देत, मी पालकमंत्री असून माझं काहीही होऊ शकत नसल्याची धमकी भुमरे यांनी दिल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे.
पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार...
मंत्री भुमरे यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करत, युवराज ने सुरुवातीला पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पाचोड पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे. विशेष म्हणजे पाचोड पोलीस ठाण्यात आपण तीन वेळा तक्रार देण्यासाठी गेलो होतो, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयात याबाबत तक्रार केली असल्याचं युवराज चावरे 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाला.
यापूर्वी देखील भूमरेंची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल....
काही दिवसांपूर्वी संदिपान भुमरे यांची आपल्या एका कार्यकर्त्याशी बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात विरोधकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा आदेश भुमरे यांनी दिला होता. तर मिरची लागेल म्हणजे विरोधकांना झोंबतील अशा पोस्ट..असेही भुमरे म्हणाले होते.
कोण आहेत संदिपान भुमरे ?
शिंदे गटात रोहयो मंत्री असलेले संदिपान भुमरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नेते समजले जातात. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीत भुमरे यांचं नाव आघाडीवर होते. तर औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भुमरे यांना संधी दिली.
आणखी वाचा : Jagdamba Sword: शिवरायांची जगदंबा तलवार 2024 पर्यंत ब्रिटनमधून परत आणणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती