(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काय सांगता! चक्क मोबाईल टॉवरच चोरीला, औरंगाबादेतील अजब चोरीची गजब कहाणी
Aurangabad Crime News: याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज भागातील एका आगळ्यावेगळ्या चोरीच्या घटनेची सद्या शहरात जोरदार चर्चा असून, चक्क एक मोबाईल टॉवरच (Mobile Tower) चोरीला गेला आहे. तर याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीटीएल कंपनीने दिलेल्या तक्रारीत चोरट्यांनी मोबाईल टॉवरसह 34 लाख 50 हजार 676 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचा म्हटले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीने ऑगस्ट 2009 मध्ये अरविंद बळवंतराव न्यायाधीश यांच्या मालकीच्या वाळूज एमआयडीसीतील के सेक्टर– 197 मध्ये नवीन मोबाईल टावर उभारणीसंदर्भात करारनामा केला होता. या करारनाम्यानुसार सदरील भूखंडाची जागा टावर उभारण्यासाठी जीटीएल कंपनीच्यावतीने 31 जुलै 2019 पर्यंत 9 हजार 500 रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर घेऊन या भूखंडावर मोबाईल टावर उभारण्यासाठी नवीन मशनरी व साहित्य आणून मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. दरम्यान कंपनीच्यावतीने मोबाईल टॉवरची उभारणी केल्यानंतर या टॉवरची देखभाल करण्यासाठी वेगवेगळ्या इसमावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. अशातच 08 फेब्रुवारी 2018 मध्ये हे मोबाईल टॉवर बंद पडले, तसेच 31 जुलै 2019 रोजी करारनाम्याची मुदत संपली.
अन् मोबाईल टॉवरच चोरीला..
मुदत संपल्याने कंपनीच्या वतीने या टॉवरची पाहणी करण्यात आली नव्हती. दरम्यान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कंपनीचे अमर लाहोट हे 27 मे 2021 रोजी वाळूज एमआयडीसीतील मोबाईल टॉवरची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना मोबाईल टॉवर, शेल्टर कॅबिनमध्ये ठेवलेले एस.सी, केबल, बॅटरी बॅकअप, एसएमपीएस रुमच्या बाजूला ठेवलेले डिझेल जनरेटर असे जवळपास 34 लाख 50 हजार 676 रुपये किमतीचे साहित्य गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठांना याची महिती दिली. त्यानंतर आता या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादेतील जंगलातांडा गाव हादरलं! बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू; गावात तापेचे रुग्ण
वाळूज भागात धाडसी चोरी...
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत घरात सर्व जण झोपलेले असताना चोरट्यांनी किचनच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत मोठ्या धाडसाने घरातील 30 हजार रुपये नगदी व सोन्या चांदीचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. वाळूजच्या साठेनगरातील बौद्ध विहार परिसरात हि घटना घडली आहे. भाजीपाला विक्री करून त्या आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह रंजना दिलीप दांडगे यांच्या घरात ही चोरी झाली आहे. तर याप्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.