'विनाशकाले विपरीत बुद्धी'! सुप्रिया सुळेंबद्दल गलिच्छ विधान करणाऱ्या सत्तारांना अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar: महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे: अजित पवार
Ajit Pawar On Abdul Sattar: शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करतांना वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका झाली. तर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली. दरम्यान आता यावर प्रतिक्रिया देतांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अब्दुल सत्तार यांचा समाचार घेत टीका केली आहे. तर 'विनाशकाले विपरीत बुद्धी' असा खोचक टोलाही पवारांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले. 'विनाशकाले विपरीत बुद्धी,' हेच त्यांना बोलले पाहिजे. काय आपण बोलतोय, मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का? मंत्री पदे येतात जातात, कोण आजी, कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो असे अजित पवार म्हणाले.
वाचाळवीरांना आवरा...
तर गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून सुरु असलेल्या वादग्रस्त विधानांच्या मालीकावरून देखील अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. या वाचाळवीरांना आवरा, त्यांना ताबडतोब सूचना द्या, महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका असे पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
अब्दुल सत्तार म्हणतात...
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन देखील करण्यात आले. तर सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादच्या घरावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला सुद्धा केला. तर अब्दुल सत्तार यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी देखील मोठ्याप्रमाणावर केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा घेणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र अशी चर्चा सुरु असतानाच अब्दुल सत्तार यांनी सूचक विधान केले आहे. औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या अब्दुल सत्तारांना राजीनाम्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी 'मी सुरक्षित आहे' असे सूचक विधान केले होते. तर मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलतांना 'मी दोन वर्ष आणि दोन महिने पक्का कृषी मंत्री राहणार' असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.