Aurangabad: 'साहेब रोजची कटकट संपवली'; पत्नीची हत्या करून पती थेट पोहचला पोलीस ठाण्यात
Aurangabad Crime News: पोलीस ठाण्यात येऊन पतीने पत्नीच्या खुनाची कबुली दिली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या आपतगाव भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीनेच आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली असल्याचे समोर आले आहे. पत्नीचं कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत जमत नसल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस ठाण्यात येऊन त्याने साहेब, रोजची कटकट एकदाची संपविली म्हणत पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. सुनीता कडूबा हजारे (वय 36 वर्षे, रा. आपतगाव, ता. औरंगाबाद) असे मृत महिलेचे, तर कडूबा भागाजी हजारे (वय 42 वर्षे) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोन वाजता कडूबा हजारे हा चिकलठाणा पोलिस ठाण्यात आला. त्याने साहेब, मी पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. रोजची कटकट एकदाची संपविली, अशी माहिती दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नेमकं काय घडलं हे पोलिसांना देखील कळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, कडूबा हजारे याने आपल्या पत्नीची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले.
नातेवाईकांकडून कोणतेही तक्रार नाही...
मृताच्या मुलाने आईला सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेले होते. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यानंतर घाटीत घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार घाटीत डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. मात्र सुनिता यांच्या हत्याप्रकरणी अजून नातेवाईकांकडून कोणतेही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे शवविच्छेदनानंतर देखील तक्रार आली नाही तर पोलिसांतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
घरात सतत वाद...
मृत सुनिता यांना दोन मुले आहेत. त्यातील एकाचे लग्न झाले असून त्या मुलासह सुनेशी सुनिताचे सतत वाद व्हायचे. सुनिताने त्यांना घरातून बाहेर काढले असून ते वेगळे रातात. तसेच, यापूर्वीच तिने सासू-सासऱ्यांनाही घराबाहेर काढले होते. एवढंच नाही तर पती कडूबासोबत देखील त्यांचे सतत खटके उडत होते. या कौटुंबिक वादाला कडूबा कंटाळला होता. त्याने अनेकवेळा तिला समजावून सांगितले मात्र, सुनिता काही ऐकत नव्हती. अखेर, कडूबाने सुनिता यांचा गळा घोटून हत्या केली.
Aurangabad: औरंगाबादमध्ये हातबॉम्ब आढळल्याने खळबळ, पण चौकशीअंती बॉम्ब स्फोटकजन्य नसल्याचे स्पष्ट