Nashik Politics : आम्ही अजित पवार, छगन भुजबळांसोबत; नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा ताबा
Nashik Politics : नाशिकमध्ये (Nashik) अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik NCP Politics : नाशिकमध्ये (Nashik) मोठी घडामोड घडत असून अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यालयाजवळ छगन भुजबळ गटाकडून शुभेच्छांचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप दिलीप खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे उपस्थित असून राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यातील बदललेल्या समीकरणांमुळे राष्ट्रवादी पक्षातही दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. अजित पवार, छगन भुजबळ यांच्या बाजूने असलेल्या गटातील नेत्यांवर राष्ट्रवादीच्या मूळ पक्षाकडून कारवाई करण्यात येत आहे. कालच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील घडामोडींमुळे काल सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nashik NCP) कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता. मात्र काल उशिरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष खैरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी कार्यालयाजवळ स्थानिक नेत्यांनी जमायला सुरवात केली आहे. कार्यालयाबाहेर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कारवाईनंतर भुजबळ गट सक्रिय झाला असून राष्ट्रवादी कार्यालय बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर अनेक नेते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मात्र यावेळी दिलीप खैरे म्हणाले की, आज कुठलीही बैठक बोलावलेली नसून आमची बैठक उद्या अकरा वाजता आहे. सुरुवातीला ते म्हणाले की, आम्ही शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांच्या सोबत आहोत. अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन बैठका उद्या होत असून कोणत्या बैठकीला जाणार? यावर ते म्हणाले की, आम्ही छगन भुजबळ यांच्या बैठकीला जाणार आहोत. आजच्या बैठकीची पोस्ट कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियावर शेअर केले असून आज कुठलीही बैठक नसल्याचे यावेळी दिलीप खैरे यांनी स्पष्ट केले.
आम्ही अजित पवारांसोबत, उद्या निर्णय
राजकारणात होत असलेल्या घडामोडींमुळे आम्ही सर्व सजग आहोत, आम्ही सर्वजण एकत्र असून हा संपूर्ण जिल्हा अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यासोबत असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उद्या मुंबईत बैठक असून यानंतर आमचा निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे अद्यापही स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचे चित्र आहे. एकीकडे बैठकीसाठी बोलवण्यात येत असताना दुसरीकडे शहरातील कार्यकर्ते आज बैठक नसून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्ते देखील दोन बाजूने असल्याचे यावरून दिसून येत आहे.