Maharashtra Politics: कशी राजकारणाने थट्टा आज मांडली... अजित पवारांनंतर नेटकऱ्यांचा मजेशीर शपथविधी
Maharashtra Politics: शिवसेना फुटीचं राजकारण कुठे संपतं नाही तर आता राष्ट्रवादी फुटीनं राजकीय भूकंप झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली अन् राजकारणात खळबळ उडाली.
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणाने एकदम फिल्मी रुप घेतलं आहे. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणतात ना, ते खरंच. महाराष्ट्रातील जनतेनं मत द्यावं तरी कोणाला? हा एक प्रश्नच आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा समजला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना, पण याच शिवसेनेत एक वर्षापूर्वी फूट पडली आणि गुवाहाटीपर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. ते प्रकरण अद्याप सावरलेलं नाही, तर नुकतीच राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीच्या (NCP) कट्टर मतदारांनी मत द्यायचं तरी कुणाला? हा प्रश्न सध्या महाराष्ट्रासमोर आहे. कारण, कुठल्याही पक्षाला मतदान केलं तरी तो शेवटी भाजपमध्येच (BJP) जातो. मग आतापासून थेट भाजपलाच मतदान करायचं का? तर अशा अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या नेटकऱ्यांनी मात्र आता एक अनोखा शपथविधी पार पाडला आहे.
सोशल मीडियावरील क्रिएटर हेरंब कुलकर्णी याने एक मजेशीर शपथविधी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे अपलोड केला आहे. राजकारणात नक्की काय चालतं? याचं उघड चित्र जनतेला दिसत नाही. पक्षात वरुन कितीही तटातूट दिसली तरी आतून सर्व आलबेल असल्याचं चित्रही अनेकदा समोर येतं. त्यामुळे ही राजकीय खेळी की खरी पक्षफूट? असा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात येतो. राजकारण्यांप्रमाणेच आपणही वागावं का? याच वाक्याला अनुसरुन सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शपथविधी पाहा...
'सोशल मिडिया'चा शपथविधी
मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की,
झुकेबर्गद्वारा स्थापित सोशल मिडियावर इथून पुढे मी कोणत्याही पक्षाला कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही किंवा दोषारोप करणार नाही. कोणत्याही नेत्याला ध्येयवादी समजून स्वतः तोंडघशी पडणार नाही. उगाच कोणाची तळी उचलून मी कोणालाही ट्रोल करणार नाही किंवा ट्रोल होणार नाही.
कोणत्याही नेत्याच्या अश्रूंना किंवा संतापाला अभिनय म्हणूनच समजून घेत स्वतः ची भावनिक गुंतवणूक करणार नाही. मी पुन्हा शपथ घेतो की, नेते जसे एकमेकांशी वरून भांडताना आतून मधुर संबंध ठेवतात, त्याप्रमाणे मी उघडपणे सर्व मित्र (Friends), फॉलोअर्स (Followers) किंवा पेड ट्रोलशी प्रेमपूर्वक संबंध ठेवेल आणि कोणालाही ब्लॉक करणार नाही.
राजकारणातून लोककल्याण होईल, अशी वेडी आशा ठेवून वेळ बरबाद न करता मी माझा व्यवसाय, कर्तव्य याकडे लक्ष केंद्रित करेन. नेटफ्लिक्सच्या वेब सिरीजसारखे राजकारणाचे एपिसोड मनोरंजन म्हणून बघत राजकारणाकडे गांभीर्याने बघणार नाही, अशी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ajit Pawar: खासदार, आमदार ते पाचवेळा उपमुख्यमंत्री; पाहा अजितदादांचा 41 वर्षांचा राजकीय प्रवास...