(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमित ठाकरेंचं निसर्गप्रेम, महाराष्ट्रभरात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबणार
महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवणार
Amit Thackeray Cleaning Campaign : महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. शनिवार 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन अमित ठाकरे (Amit Thackeray) यांकडून करण्यात आलं आहे.
'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' संदर्भात आवाहन करणारा एक व्हिडीओ अमित ठाकरे यांनी जारी केला आहे. अमित ठाकरे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, "नमस्कार, मी आज तुमच्यासमोर माझ्या मनाच्या जवळचा एक मुद्दा घेऊन येत आहे. ते म्हणजे, आपले समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणे. आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे 720 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय, असं मला वाटतं. आपल्या सर्वांनाच कुठे ना कुठेतरी वाटत असेल, परदेशात असलेली समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि आपल्या राज्यात ते का असू शकत नाही? आपले समुद्र किनारे अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे. फक्त सरकारवर अवलंबून न राहता, आपल्याला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जगभरातील विविध देशांत समुद्र आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना अख्या महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील 40 समुद्र किनाऱ्यांवर येत्या 11 डिसेंबरपासून रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीनं हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!"
पाहा व्हिडीओ : अमित ठाकरेंचा अनोखा उपक्रम ; महाराष्ट्रभरात 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबणार
दरम्यान, राज्यातील 40हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं आहे.
आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज
आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठीच आजची बैठक बोलवण्यात आली होती, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना सांगितलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली. राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज; राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
दिवसभरातील बातम्या लाईव्ह पाहण्यासाठी एबीपी माझा युट्यूब चॅनलवर भेट द्या