Maharashtra Corona Cases: चिंताजनक! नाशिक, नागपूरमध्ये आजवरची सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद, तर पुण्यात सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नाशिक, नागपूरमध्ये आजवरची सर्वाधिक रुग्णांची नोंद झालीय तर पुण्यात सर्वात सध्या सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई : राज्यात आज तब्बल 23 हजार 179 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातही चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेड, ठाणे, अमरावती, अकोला जिल्ह्याचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळा प्रशासन आणि नागरिकांसाठी आव्हान ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 4745 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर पंधरा रुग्णांचा मृत्यू झालाय. ही आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एका दिवसात आढळून आलेली दुसऱ्या क्रमांकाची रुग्णांची संख्या आहे. 9455 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर त्यामधून 4745 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. या आधी 10 सप्टेंबर 2020 ला पुण्यात 4935 रुग्णांची नोंद झाली होती. सध्या राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. कारण, रोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून तब्बल 32,359 अॅक्टीव कोरोना बाधित रुग्ण आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक आहे.
नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ
नाशिक जिल्ह्यातही आज कोरोना रुग्णसंख्येत रेकॉर्डब्रेक वाढ पहायला मिळाली. यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 ला 2 हजार 48 रुग्णांची नोंद झाली होती. तर आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 2 हजार 146 नवे रुग्ण आणि 9 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात सर्वाधिक बाधित तर ग्रामीण भागातही वाढता प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. नाशिक शहर - 1296, नाशिक ग्रामीण - 631, मालेगाव मनपा - 174 तर जिल्हा बाह्य - 45 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. आज 697 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. अॅक्टिव रुग्णसंख्येनेही 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या 10 हजार 851 बाधितांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली तर 7 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. 442 जणांना (मनपा 357, ग्रामीण 85) घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 52515 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1335 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61435 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1368 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7552 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नागपूर शहरातील आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या
विदर्भातील नागपूरमध्येही कोरोना संसर्ग वेगाने पसरताना दिसत आहे. आज 3370 नवे कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यात नागपूर शहरात 2668 तर नागपूर ग्रामीणमधील 699 रुग्ण आहेत. नागपूर शहरातील आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद झालीय. दरम्यान, 1216 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर 16 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आज 15000 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यामध्ये पॉजिटिव्ह टक्केवारी 22.5% इतकी जास्त आहे. सध्या 21118 अॅक्टीव रुग्ण उपचार घेत आहेत.
डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या
मुंबई पाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून कल्याण डोंबिवली क्षेत्रात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 250 ते 400 च्या घरात होती. मात्र, आज सर्वाधिक 593 रूग्ण आढळले आहेत. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने पालिकेने काही निर्बंध लावून दिले आहे. मात्र, नागरिक नियम पाळतानासुद्धा दिसत नाही.