Nagpur : बेपत्ता नागरिकांचा शोध घेणं सोपं होणार; नागपुरातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवारांकडून 'पोलीस क्लब इंडिया' अॅपची निर्मिती
Nagpur Police :पोलीस क्लब इंडिया' ॲपच्या माध्यमातून देशभरातील 13 हजार 789 पोलीस स्टेशन हरवलेल्या, बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे
नागपूर : हरवलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेणे, बेवारस मृतदेहांची ओळख पटविणे, हरवलेले वाहन, मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर वस्तू शोधणे हे पोलिसांसाठी नेहमीच आव्हानात्मक कार्य असते. कायदा सुव्यवस्था राखणे, राजकीय व इतर आंदोलनाचे बंदोबस्त पाहणे, व्हीव्हीआयपी सुरक्षा सांभाळणे असे अनेक कार्य डोक्यावर असल्याने बऱ्याच वेळेला पोलीस इच्छा असूनही हरवलेली माणसे आणि वस्तूंच्या शोध कामासाठी सर्व शक्ती पणाला लावू शकत नाही. अगदी एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीची किंव एका ठिकाणातून हरवलेल्या मोबाईल किंवा वस्तूची माहिती शेजारील पोलीस स्टेशनपर्यंतही नसते. त्यामुळे हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तूच्या शोधकार्याबद्दल पोलीस गंभीर नाहीत असा आरोप केला जातो. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने या समस्येला गांभीर्याने घेत माणसे, वाहन, मोबाईल, इतर वस्तू शोधण्याच्या आणि त्याबद्दलची माहिती देशभरातील सर्व पोलिसांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात तंत्रज्ञानाची मदत घेण्याच्या उदिष्टाने एका खास मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती केली आहे. नागपुरातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार यांनी तीन वर्ष रिसर्च करून, स्वखर्चाने 'पोलीस क्लब इंडिया' या मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे.
आपण नेहमी पाहतो की काही सरकारी नोकर फक्त नोकरी करतात. मात्र, काही जण आपल्या नोकरीतून, आपल्या कामातून खऱ्या अर्थाने समाजाप्रती आपलं कर्तव्य ही पूर्ण करतात. नागपूर शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार ही त्यापैकीच एक... पोलीस म्हणून बेपत्ता होणाऱ्या लोकांची खासकरून बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांची समस्या किती भीषण आहे. आपल्या मुलीला, बहिणीला, पत्नीला किंवा आईला गमावणाऱ्या कुटुंबाची अवस्था नंतर काय होते हे पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना नितीन कोयलवार यांनी जवळून पाहिले. त्यामुळे त्यांनी तीन वर्ष रिसर्च करून स्वखर्चातून हरवलेले व्यक्ती, बेपत्ता झालेल्या मुली, महिला, लहान मुले, चोरी गेलेले वाहन, मोबाईल सह इतर वस्तूंचा चा शोध लागावा यासाठी एक मोबाईल खास अप्लिकेशन विकसित केले आहे. जर महाराष्ट्र पोलिसांसह देशभरातील पोलीस यंत्रणेने या अँपचा वापर केला. तर हरवलेल्या लोकांचा, हरवलेल्या वस्तूंचा शोध घेणं खूप सोपं होईल असा कोयलवार यांचा दावा आहे.
हरवलेल्या मुली व महिलांची संख्या लाखात, त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष
तुम्ही देशातील कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गेले. तर बाहेर दारावरच्या बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती नजरेस पडते. मात्र, ते पाहून देशात आणि महाराष्ट्रात बेपत्ता असलेल्यांची संख्या किती मोठी आहे याचा अंदाज येत नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यानुसार गेल्या काही वर्षात देशभरातून बेपत्ता होणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामध्ये महिला व मुलींची संख्या तर डोळ्यात अंजन घालणारी आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकड्यानुसार
2016 - 1 लाख 74 हजार 021 मुली व महिला बेपत्ता झाल्या
2017 - 1 लाख 88 हजार 382 मुली व महिला बेपत्ता झाल्या
2018 - 2 लाख 23 हजार 621 मुली व महिला बेपत्ता झाल्या
2019 - 4 लाख 22 हजार 439 मुली व महिला बेपत्ता झाल्या
2020 - 4 लाख 23 हजार 655 मुली व महिला बेपत्ता झाल्या
एका अंदाजाप्रमाणे 2021 मध्ये बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींचा आकडा पाच लाखांच्यावर आहे.
हरवलेल्यांपैकी सापडतात किती?
दुर्दैव म्हणजे देशात लाखो पोलीस आणि सुरक्षा दल कार्यरत असून ही बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांपैकी फक्त 50 टक्केच सापडतात. उर्वरित 50 टक्के कुठे जातात, त्यांच काय होतं हे कधीच समोर येत नाही. काहींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. तर अनेक मुलांना भिक्षा मागण्याच्या किंवा अमली पदार्थांच्या तस्करीच्या कामाला जुंपले जाते.. आणि हरवलेले हे व्यक्ती कधीच आपल्या कुटुंबियांना भेटू शकत नाही..
सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार यांनी काय केले
गेले अनेक वर्ष पोलीस दलात काम करताना सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार यांना या भीषण समस्येची जाणीव होतीच. ज्यांच्या कुटुंबातील मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई हरवते. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवते, ते उर्वरित आयुष्य कोणत्या नैराश्यात जगतात हे कोयलवार यांनी जवळून पाहिले होते. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आल्यानंतर मनुष्यबळाचा अभाव आणि पेंडिंग केसेसचा भरमसाठ भार असल्याने पोलीस इच्छा असून ही बेपत्ता असलेल्यांच्या शोधासाठी अपेक्षित शक्ती पणाला लावू शकत नाही. त्यामुळेच कोयलवार यांनी देशभरातील सर्व बेपत्ता असलेल्या लोकांची माहिती एकाच ठिकाणी कशी एकत्रित करता येईल यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. त्यांनी तीन वर्ष अभ्यास आणि संशोधन करत स्वतःच्या खिशातून लाखो रुपये खर्च करून 'पोलीस क्लब इंडिया' नावाचा अँड्रॉइड बेस मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले. या अॅप च्या माध्यातून देशभरातील 13 हजार 779 पोलीस स्टेशन एकमेकांशी जोडणे शक्य होणार असून कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी देशातील कुठल्याही भागातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीची माहिती या अॅपवर टाकू शकेल. ती देशभरातील इतर सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना सहज उपलब्ध होईल. या तपशिलाची व्यक्ती देशात कुठेही दिसून आल्यास तिथल्या पोलिसांनी ती माहिती अ्ॅपवर शेअर केल्यास चटकन नोटिफिकेशनच्या स्वरूपात शोध घेणाऱ्या पोलिसांना ती माहिती उपलब्ध होईल अशी व्यवस्था या अॅपमध्ये आहे.
पोलीस क्लब इंडिया हे अॅप फक्त हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी नाही तर इतर शोध कामात देखील उपयोगी
कोयलवार यांनी विकसित केलेले अॅप फक्त बेपत्ता असलेल्या लोकांच्या शोधासाठीच उपयोगी ठरणार नाही. तर देशभरातील पोलिसांना चोरी गेलेल्या वाहनांसह हरवलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तूंच्या शोध किंवा ट्रॅकिंगसाठी मदतीचा ठरणार आहे. देशभरातील सर्व पोलिसांसाठी बेवारस मृत ( प्रेत ) व्यक्तींची ओळख पटवणे अत्यंत कठीण कार्य असून अनेक लोकांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कधीच मिळत नाही आणि त्यांचे अंत्यसंस्कार बेवारस म्हणूनच होऊन जातात. देशात कुठेही बेवारस मृतदेह आढळल्यास तिथले पोलीस या अॅपच्या माध्यमातून त्याची माहिती इतर सर्व पोलिसांच्या मोबाईल मध्ये अवघ्या काही सेकंदात पाठवू शकणार आहे. त्यामुळे बेवारस मृतांची ओळख पटवण्यासाठी ही हे अॅप मदतीचे ठरणार आहे.
हे अॅप कोणासाठी?
पोलीस क्लब इंडिया नावाचे हे अॅप फक्त पोलीस दलासाठी नाही. हे अॅप प्ले स्टोर वरून कोणाला ही मोफत डाउनलोड करता येते. त्यामुळे सामान्य व्यक्ती ही आपल्या हरवलेल्या वस्तूबद्दल या अॅपवर माहिती टाकून त्याच्या मध्यमातून त्याचा शोध घेण्याचे काम करू शकतो. मात्र, त्यासाठी हरवलेल्या त्या वस्तूची माहिती अॅपवर अपलोड केल्यानंतर इतरांनी ते माहिती पाहिल्यावर आणि संबंधित वस्तू बद्दल काही माहिती मिळाल्यास रिस्पॉन्स देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी हे अॅप स्वीकारले तर
कोयलवार यांचा दावा आहे की देशभरातील हजारो लोकांनी पोलीस क्लब ऑफ इंडिया नावाचा अॅप वापरायला सुरुवात ही केली आहे..मात्र, त्याची खरी उपयोगिता तेव्हाच होईल जेव्हा महाराष्ट्र पोलिसांसह देशभरातील इतर पोलीस दल त्याचा वापर सुरु करतील. त्यामुळे एका अधिकाऱ्याने केलेल्या या स्तुत्य प्रयत्नाकडे महाराष्ट्राच्या गृह विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र पोलिसांनी हेच अॅप स्वीकारले किंवा यासारखे दुसरे अॅप पोलीस दलासाठी सुरु केले तर नक्कीच दरवर्षी बेपत्ता होणाऱ्या लाखो लोकांचा शोध घेणे शक्य होणार आहे.