(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Police : लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलीस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील
Mumbai Police : गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे
Mumbai Police : तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Police) हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी मिळत आहे. या बातमीने मुंबई पोलिसांत खळबळ निर्माण झाली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे
मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी
पाच वर्षांच्या चौकशीनंतर मुंबई शहर पोलीस विभागातील एका हेड कॉन्स्टेबल दोषी आढळल्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले. बनावट आणि डुप्लिकेट पासपोर्ट वापरून किमान 43 लोकांना परदेशात पाठवण्यासाठी मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी केल्याबद्दल पोलिसांच्या चौकशीत तो दोषी आढळला. पोलीस सूत्रांनी सांगितले की, पोलीस हवालदार संजय थोरात याची 2017 मध्ये इमिग्रेशन आणि पासपोर्ट क्लिअरन्सची देखरेख करणाऱ्या विशेष शाखा II मध्ये नियुक्ती झाली, तेव्हा त्याने हे कृत्य केले. ज्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी थोरात याला कार्यमुक्तीचा आदेश जारी करण्यात आला.
गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील
पोलिसांनी सांगितले की, थोरात याने मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये बनावट आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर सहार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती.
महाराष्ट्र किती असुरक्षित?
गुन्हेगारी प्रवृत्तींच्या अशा पोलिसांवर कोणाचा वचक आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकूणच या सर्व घटनांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र किती असुरक्षित आहे ते समोर आले आहे. जेव्हा रक्षकच ‘भक्षक’ होतात, तेव्हा सर्वसामान्यांनी करायचे काय, हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्रग्जमाफियाला मदत केल्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांवर अशा प्रकारचे आरोप होणे किंवा पोलिसांना अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक होणे ही फार धक्कादायक गोष्ट आहे. अशा काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीस्वरूप असलेल्या पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणे आवश्यक आहे
इतर महत्वाच्या बातम्या