Nagpur : नागपुरातील 'या' शाळेबाहेर अनोळखी व्यक्तीने वाटले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरु
Nagpur News : अनोळखी व्यक्तीने दिलेली चॉकलेट खाल्ल्याने सीताबर्डी (Sitabuldi) येथील मदन गोपाल हायस्कूलमधील 17 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.
![Nagpur : नागपुरातील 'या' शाळेबाहेर अनोळखी व्यक्तीने वाटले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरु A stranger distributed chocolates outside school in Nagpur 17 students poisoned admitted to hospital Nagpur : नागपुरातील 'या' शाळेबाहेर अनोळखी व्यक्तीने वाटले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/a2c1812d30d9296064fe7d2a4be1db161670144974217440_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : अनोळखी व्यक्तीने दिलेली चॉकलेट खाल्ल्याने सीताबर्डी (Sitabuldi) येथील मदन गोपाल हायस्कूलमधील 17 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेने शाळेत एकच खळबळ उडाली. विषबाधा झाल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सध्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे.
सीताबर्डी परिसरात मदन गोपाल अग्रवाल (Madangopal Agrawal High School) शाळा आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मधली सुट्टी झाली. तिसरी, चौथी आणि पाचव्या वर्गातील मुले शाळेबाहेर आल्यानंतर एक अनोळखी व्यक्ती चॉकलेट वाटत असल्याचे त्यांना दिसले. 'माझा वाढदिवस आहे' असे सांगत त्या व्यक्तिनं काही विद्यार्थ्यांनाही चॉकलेट दिली. मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात परतले. मात्र, काही वेळातच त्यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागली.
काहींना उलट्या आणि चक्कर येऊ लागल्याने वर्गशिक्षिकांनी ही माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांना जवळ असलेल्या लता मंगेशकर रूग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकाराने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. त्यामुळे इतरही मुलांना चक्कर आणि उलट्याचे त्रास सुरू झाले. त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांवर प्रथमोपचार केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख यांनी दिली. तीन विद्यार्थ्यांना अधिक त्रास झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यांना एक दिवस निरीक्षणात ठेऊन डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली. सीताबर्डी पोलिसांनीही अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे. घटना घडल्यानंतर त्याबाबत बरेचजण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असल्याचेही आढळून आले. काळ्या गाडीतून आलेल्या व्यक्तीने चॉकलेट वाटल्याचे तर कुणाकडून शाळेत वाढदिवस असल्याने त्याने चॉकलेट दिल्याचे सांगण्यात येत होते. यावेळी काहींनी चॉकलेट वाटणारा मास्क घालून असल्याचेही सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापनाने शाळेबाहेर हा सर्व प्रकार घडल्याचे स्पष्ट केले.
पालकांमध्ये खळबळ
शाळेतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वच पालकांनी लता मंगेशकर रुग्णालयाकडे (Lata Mangeshkar Hospital) धाव घेतली. मात्र, काही वेळातच मुले धोक्याबाहेर असल्याचे कळताच, त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. विषबाधा झाल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना कळताच त्यांनी लता मंगेशकर रुग्णालयात ताफ्यासह घाव घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांकडून मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच पालकांनाही विचारणा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेट वाटल्याची माहिती दिली. त्यामुळे चॉकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शाळा आणि परिसरातील सर्वच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी सांगितले.
ही बातमी देखील वाचा
Nagpur News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वी विमानतळ परिसरात कर्नाटक सरकारचे पोस्टर्स; चर्चांना उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)