Devendra Fadnavis : बारसू आंदोलकांना बेंगळुरूमधून फंडिंग, फडणवीसांचा गंभीर आरोप; आंदोलकांनी दिलं चॅलेंज, सिद्ध करून दाखवा...
Devendra Fadnavis On Barsu Protest : आरे असो वा बारसू...यामध्ये आंदोलन करणाऱ्या एकाच व्यक्ती असून त्यांना परराज्यातून फंडिंग होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. तर , आंदोलकांनी हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले.
Devendra Fadnavis On Barsu Protest : कोकणातील बारसू रिफायनरी (Barsu Refinery Protest) आंदोलनाच्या मुद्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला. राज्यात होत असलेल्या आंदोलनामागे व्यापक कट असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. राज्यात होत असलेल्या विविध आंदोलनात त्याच व्यक्ती दिसत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असे प्रतिआव्हान आरे वाचवा (Save Aarey) आणि बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांनी दिले आहे.
विधान परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बारसू रिफायारी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आपण उशीर केला त्यामुळे कंपनीने आपली गुंतवणूक पाकिस्तानमध्ये नेली आहे. त्याचा फायदा पाकिस्तानला होतो आहे. आता रिफायनरी होणार आहे. इथं जे प्रकल्पांना विरोध करतात तेच लोकं आरे आंदोलन, नर्मदा आंदोलन, बारसू आंदोलन सगळीकडे दिसतात. हे लोक सातत्यानं बेंगलुरुला जातात आणि त्यांच्या खात्यावर पैसे तिथून येतात, असा आरोप फडणवीस यांनी केला. ग्रीन पीस या स्वयंसेवी संस्थेला बंदी आहे. या संस्थेच्या संपर्कात हे आंदोलक आहेत. त्यांच्याकडून फंडिंग मिळवत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांचा चर्चा करण्याचा स्वभाव नाही; आरे वाचवा आंदोलकांची टीका
गृहमंत्र्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे, पुरावे दाखवायला पाहिजे होते. फक्त वक्तव्य करायचं आणि बाजूला व्हायचं हेच त्यांचे चाललं आहे असल्याची टीका आरे वाचवा आंदोलनातील प्रमुख नेते दयानंद स्टॅलिन यांनी केली आहे.
बारसू आंदोलनातील लोकं आरे आंदोलनात नव्हते, त्यांचे बोलणं तथ्यहिन असल्याचा आरोपही त्यांनी केला. फडणवीस यांच्या मते फक्त भाजपचे कार्यकर्ते एका ठिकाणी आंदोलन करु शकतात आणि दुसरेकडे आंदोलन करु शकतात. आणि त्यांच्या कार्यक्रमात जाऊ शकतात, असे म्हणणे का? बाकीच्या भारतीयांना आवाज उठवण्याचा अधिकार नाही का असं त्यांना म्हणायचं आहे का? असा सवालही त्यांनी केला.
बारसू रिफायनरीविरोधात स्थानिक लोकं आंदोलन करत आहेत. फडणवीस यांनी अशी वक्तव्ये करून आंदोलन करणाऱ्या लोकांचा अपमान करु नये. ते मान करतच नाहीत मात्र अपमान देखील करु नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा चर्चा करण्याचा स्वभाव नाही. आम्ही मागील 10 वर्षापासून त्यांना जाहीर चर्चेसाठी आमंत्रण देत आहोत.
देवेंद्र फडणवीस यांनी कारशेडसाठीच्या कांजूरच्या जागेसंदर्भात किती खोटं बोलले आहेत हे समोर आलं असल्याचेही स्टॅलिन यांनी सांगितले. फडणवीस यांनी कांजूर येथील जागा मिठागराची जागा आहे, कांदळवन आहे, खासगी विकासकाला ती जागा द्यावी लागेल, फायदा पोहोचवण्यासाठी आंदोलन होतंय वगैरे दावे केले होते. मात्र, आज विधिमंडळात ती जागा राज्य सरकारची असल्याचे मान्य करण्यात आले आहे. मग तुम्ही जनतेसाठी काम करता आहात की विकासकासाठी काम करत आहात? असा सवाल ही दयानंद स्टॅलिन यांनी केला. शापूरजी पालनजीचा प्रकल्प सीआरझेडच्या जमिनीवर पुढे न्यावा यासाठी फडणवीस प्रयत्नशील होते असा आरोपही स्टॅलिन यांनी केला. फडणवीस यांनी आमचे आरोप नाकारावे, आम्ही माध्यमांना याचे पुरावे देऊ असे आव्हानही त्यांनी दिले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडं फेकू नये, आमची काही घरं काचेची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं असा टोलाही दयानंद स्टॅलिन यांनी लगावला.
ग्रीनपीनचा आणि आमचा काहीही संबंध नाही. त्यातील लोकं बारसू आणि आरेच्या आंदोलनात कधीच आले नाहीत, असा दावाही त्यांनी केला. कोकणची लोकं आंदोलन स्थानिक पातळींवर लढत आहेत. कोणत्याही जन आंदोलनाला बदनाम करत दिशाभूल करण्यात फडणवीस यांची खासियत असून आम्ही ते सिद्ध करू असेही स्टॅलिन यांनी सांगितले. सार्वजनिक मंचावर चर्चेसाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुमचा प्रतिनिधी पाठवा. लोकांसमोर चर्चा करु, होऊनच जाऊ द्या एकदा, असे आव्हानही त्यांनी फडणवीसांना दिले.
कोणाकडून फंड येतो, याचे पुरावे द्या; आंदोलकांचे आव्हान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केलेल्या आरोपावर आंदोलकांनी थेट पुरावेच देण्याचे आव्हान दिले आहे. बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनातील प्रमुख नेते सत्यजित चव्हाण यांनी म्हटले की, बारसू आंदोलकांना फंडिंग कुठून होत याचे पुरावे दाखवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचे आहे. मी स्वतः राजापूरचा आहे. माझ्या सोबतचे रिफायनरीला विरोध करणारे अनेकजण स्थानिक आहेत. त्यामुळे वाढवण, आरे आंदोलनाला तेच चेहेरे बारसूला आहे हे म्हणणं चुकीचे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. आम्हाला कोणाकडून फंड येतो हे दाखवून द्या पुरावे द्या. तुम्ही गृहमंत्री आहेत, तुम्ही आधी पुरावे द्या, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. आम्ही निसर्गाचा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नसल्याचा निर्धारही चव्हाण यांनी व्यक्त केला. सरकार दिशाभूल करत करत असून आंदोलन सुरुच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.