(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Oxygen Leak : नाशिकमधील घटना दु:खद : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. घडलेली घटना ही अतिशय दु:खद असल्याची भावना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. तसेच मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू होते. रुग्णालयत 150 रुग्णांची क्षमता असताना सकाळी 10 वाजता 157 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील 131 रुग्ण हे ऑक्सिजनवर होते तर 15 रुग्ण वेंटीलेटरवर होते. त्यातील 63 रुग्णाची स्थिती अतिशय नाजूक असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या :