(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Silver Oak St Protest : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर आज सुनावणी, बिकट अवस्था असल्याचं जामीन अर्जात नमूद
Silver Oak St Protest : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत.
Silver Oak St Protest : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. यात 24 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापैकी बरेसचे जण हे मुंबई बाहेरून आले आहेत, त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नाहीत, हमीदार नाही अशी त्यांची बिकट अवस्था असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद केलेलं आहे.
29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश
सिल्व्हर ओकवरील आंदोलनप्रकरणी येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना जारी करण्यात आले आहेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून यात तपास सुरू आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्यावतीनं जयश्री पाटील यांच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. मात्र एफआयआरमध्ये त्यांचं अद्याप नाव टाकलेलं नाही. तिसऱ्या रीमांडला पाटील यांच्या सहभागाचा उल्लेख झाला तसेच एफआयआर क्रमांकांमध्ये काही तांत्रिक दोष असल्याच्या मुद्यावर कोर्टानं त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला
काय आहे प्रकरण
राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी दुपारच्यावेळी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं चपला भरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार नारेबाजी केली होती. साधराण तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलीसांनाी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं. याप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांकडे याचा आज फैसला
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. सदावर्ते यांच्या वकिलांना या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांचा ताबा गावदेवी पोलिसांकडे जाणार की कोल्हापूर पोलिसांकडे याचा निर्णय होणार आहे.