Pune News : राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? पालक वर्गात संतापाची लाट
Pune News : पदभार दिल्यापासून 110 दिवसात शिक्षणाधिकाऱ्याकडून पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
![Pune News : राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? पालक वर्गात संतापाची लाट Maharashtra Marathi News transfer of education officer Anger among parents in daund pune Pune News : राजकीय संस्थाचालकांच्या हट्टापायी कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? पालक वर्गात संतापाची लाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/27/6aa897d563deb4192dcd2855b99a29d31658880287_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News : दौंड तालुक्यातील बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणारे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. किसन भुजबळ हे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विस्तार अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्याच पदावर कार्यरत असताना भुजबळ यांना गट शिक्षण अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. पदभार दिल्यापासून 110 दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे..
कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकाऱ्याची तडकाफडकी बदली?
किसन भुजबळ यांनी बोगस शिक्षण संस्थांना लगाम लावून पाच शिक्षण संस्थांना टाळे ठोकले तर तीन शिक्षण संस्थांकडून 14 लाख रुपयांचा दंड आकारण्यासंदर्भात संबंधित शिक्षण संस्थांना नोटीसा पाठवल्या होत्या. तसेच कामकाजात चुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांना सूचना देखील दिल्या होत्या. परिणामी अचानक कुठल्याही शाळेला भेटी देणाऱ्या किसन भुजबळ यांचा एक अंकुश दौंड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेवर बसला होता. परंतु अचानक भुजबळ यांचा अतिरिक्त असलेला पदभार काढून घेतला. किसन भुजबळ यांच्याजागी शिरूरचे बाळकृष्ण कमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अवघ्या 110 दिवसात पदभार काढून घेतला
7 एप्रिल 2022 रोजी किसन भुजबळ यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. अवघ्या 110 दिवसात भुजबळ यांच्याकडे असणारा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला. हा पदभार काढून घेत असताना प्रशासकीय कारणास्तव हा पदभार काढून घेत असल्याचे कारण जिल्हा परिषदेने दिले आहे. राजकीय संधान बांधून असलेल्या काही शिक्षक पुढाऱ्यांना तसेच तसेच राजकीय संस्थाचालकांना त्यामुळे किसन भुजबळ यांच्या तक्रारी वाढल्या आणि एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला राजकारणाचा बळी पडावे लागले आणि त्यांची बदली झाली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
पालकांमध्ये संतापाची लाट
दरम्यान गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर कारवाई करून जिल्हा परिषदेने काय मिळवलं? असा सवाल देखील निर्माण झाला आहे. ज्या अधिकाऱ्याने आपले काम प्रामाणिकपणे केलं त्याचा पदभार का काढून घेतला असा प्रश्न नागरीक विचारत आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)