(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona And Criminal : कोरोना काळात तुरुंगातून पेरोलवर सोडलेले कैदी तुरुंगात परतलेच नाही, नागपूर पोलिसांचे वाढले टेन्शन!
Corona And Criminal : 48 तासात हे बेपत्ता झालेले कैदी सापडले नाही. तर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहे.
Corona And Criminal : कोरोना काळात नागपूरच्या तुरुंगातून आकस्मिक अभिवचन रजा म्हणजेच पेरोल वर सोडण्यात आलेले तब्बल 360 कैदी नागपूर तुरुंगात परतलेले नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
नागपूर पोलिसांचे वाढले टेन्शन!
कोरोनाच्या नावाखाली तुरूंगातून सोडण्यात आलेले हे 360 कैदी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही ना? अशी शंका नागपूर पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तुरुंगात न परतलेल्या 360 कैद्यांना 48 तासात शोधण्याचे आदेश काढले आहे..
360 कैद्यांना 48 तासात शोधण्याचे आदेश
कोरोना काळात तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणातील हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर तुरुंगाबाहेर पाठवले होते. कोरोना संकट टळल्यानंतर नुकतच या सर्व कैद्यांनी परत तुरुंगात परतावं असे आदेश काढण्यात आले. नागपूर विभागात त्या आदेशाची मर्यादा 27 मे रोजी संपल्यानंतरही नागपूरच्या तुरुंगातून आकस्मिक अभिवचन रजा मिळालेल्या 496 कैद्यांना पैकी फक्त 130 कैदीच तुरुंगात परतले आहे. त्यामुळे बहुतांशी कैद्यांनी गृह विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 48 तासात हे बेपत्ता झालेले कैदी सापडले नाही. तर या कैद्यांच्या अभिवचन रजेसाठी गॅरंटी (हमी) घेणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहे.
नागपुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
दरम्यान, नागपूरच्या तुरुंगातून अभिवचन रजेवर सुटलेले अनेक कैदी कुख्यात गुन्हेगार असून ते तुरुंगात परत न आल्यामुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. या 360 कैद्यांमुळे आधीच क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये अशी चिंता नागपूर पोलिसांना आहे. त्यामुळे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरच्या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पेरोल वर सुटूनही तुरुंगात न परतलेल्या कैद्यांना शोधण्याचे आदेश दिले आहे.