Maharashtra Breaking News 26 June 2022 : मुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणी कपात, राज्यातील घडामोडीची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Jun 2022 05:16 PM
Presidential Election 2022: यशवंत सिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार दिल्लीत

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत दखल झाले आहेत. राष्ट्रपतीपदाचे विरोध पक्षांचे उमेदवार यशवंत सिंह यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार दिल्लीला पोहोचले आहेत. 

चिंचपोकळीच्या 'चिंतामणी'चा पाटपूजन सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

चिंचपोकळी गिरणगावातील शतक महोत्सवात पदार्पण करणारे एकमेव असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळी चा चिंतामणी' या नावाने प्रसिद्ध असणार्‍या उत्सव मंडळाची स्थापना 1920 साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना काळ पाहता उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता, यंदा कोरोना संक्रमण तीव्रता थोडी कमी असल्याने तसेच परिस्थिती पुर्वपदावर येत असल्याने मंडळाने गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करण्याचे ठरविले. यंदाचे हे 103 वर्ष असून चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचा शुभारंभ आज रविवारी 26 जून 2022 रोजी सायंकाळी पाटपूजन सोहळ्याने झाला.

गुजरातमधील नशेच्या 'बटण गोळ्या' औरंगाबादेत; पोलिसांच्या कारवाईमुळे मोठा खुलासा

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून नशेच्या 'बटण गोळ्या' विक्री मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष पथकाची स्थपना करून कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठा खुलासा झाला आहे. या गोळ्यांचे गुजरात कनेक्शन समोर आले असून, गुजरातमधील सुरत येथून मेडिकलमधून या गोळ्या खरेदीकरून औरंगाबाद शहरात एजंटामार्फत विक्री केली जात असल्याचे समोर आलाय. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

औरंगाबाद : स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवायचा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : रस्त्यावर सापडलेल्या सीम कार्डच्या नंबरचा वापर करून, एका माथेफिरू तरुणाने स्वतःचे नग्न फोटो गावातील महिलांना व्हॉटस्ॲपवरून पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना गावात हा सर्व प्रकार घडला आहे. सायबर पोलिसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाने ह्या घटनेचा खुलासा झाला आहे. अभिषेक अशोक वाघ (20, रा. शिवना, सिल्लोड)  असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 


सविस्तर बातमी येथे वाचा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना चार दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना रविवारी चार दिवसांनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांनंतर कोश्यारी यांचं राजभवन येथे आगमन झालं. राज्यपाल कोश्यारी यांना 22 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रिलायन्स रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता राज्यपाल कोरोनातून बरे झाल्यावर त्यांना रुग्णालायातून घरी सोडण्यात आलं आहे. यावेळी राज्यपालांनी ट्विट करत सर्व डॉक्टर, नर्स, रूग्णालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे आभार मानले आहेत. 


सविस्तर बातमी येथे वाचा

1 जुलैपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम

जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 जुलैपासून अनेक मोठे बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम खिशावर होणार आहे. चला जाणून घेऊया असे कोणते बदल आहेत, ज्याचा परिणाम थेट खिशावर होईल. पॅन- आधार लिंकिंग, क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस, AC होणार महाग, ऑफिसच्या वेळा बदलतील यासह एलपीजी किमतीत बदल होणार आहे. 


सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीच्या दौऱ्यावर

PM Modi Germany and UAE Visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 26 जून ते 28 जूनदरम्यान जर्मनी (Germany) आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री मोदी जर्मनीमध्ये जी-7 शिखर संमेलनात (G-7 Summit) सहभागी होणार आहेत. यासह ते माजी राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी यूएईचा दौरा करतील. याआधी 2 मे रोजी पंतप्रधान जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी जर्मनीचे चान्सलर (German Chancellor) ओलाफ स्कोल्स यांनी पंतप्रधान मोदी यांना जी 7 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

वाराणसीत CM योगी थोडक्यात वाचले, हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, त्यानंतर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. योगी आदित्यनाथ वाराणसीहून लखनऊला जात होते, त्यानंतर हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. याचे कारण म्हणजे सीएम योगींच्या हेलिकॉप्टरवर अचानक पक्षी आदळला, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती असे सांगण्यात येत आहे. मात्र या पक्ष्याच्या धडकेनंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यादरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित आहेत.


सविस्तर बातमी येथे वाचा

मंकीपॉक्स जागतिक आणीबाणी? WHOचं मोठं वक्तव्य

जगातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा धोका वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) बैठक पार पडली. या बैठकीत WHO नं निर्णय घेतला आहे की, मंकीपॉक्स विषाणू अद्याप जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) नाही. जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेनं आपात्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

दारूच्या नशेत मध्यरात्री वृद्ध सासू-सासर्‍यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या

एकाने दारूच्या नशेत आपल्या वृ्द्ध सासू-सासऱ्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नी आणि मुलीवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला जवळच्या जंगल भागातून अटक केली आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही घटना घडली. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सुरू होणार, दोन वर्षानंतर अखेर मुहूर्त

Hutatma Express : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात अनेकांचे हाल झाले. वाहतुकीची अनेक साधने बंद असल्याने प्रवासही बंद होता. नाशिक पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची भुसावळ-नाशिक-पुणे ही सेवाही बंद होती. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 पासून बंद करण्यात आलेली भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सेवा 10 जुलैपासून दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु होत आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

आज जेजुरीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

Ashadhi Wari 2022 : सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात. त्यामुळे सासवड सोडताच येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष कानी पडत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल यवतमध्ये मुक्काम होता. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान ठेवेल त्यानंतर वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा... 

कोल्हापूर : साळोखे नगर परिसरात अवघ्या 20 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

कोल्हापूर शहरातील साळोखे नगर परिसरात अवघ्या 20 वर्षीय तरुणाचा भोसकून निर्घृण खून केल्याची घटना घटना घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव संकेत पाटील (वय 20, रा. वाल्मिकी वसाहत, कोल्हापूर) असे आहे. कोपर्डेकर हायस्कूल समोरील मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला.  दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मृत संकेत पाटील हा सरनोबतवाडीमधील एका गॅरेजमध्ये उदरनिर्वाह करत होता. पोलिसांनी  त्याचा शनिवारी रात्री खून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.  


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

मुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणी कपात

मुंबईकरांना आता पाणी आणखी काटकसरीने वापरावे लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातही ही 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.   


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

लावणी कलाकारांकडून चौफुल्यावर वारकऱ्यांची अनोखी सेवा

आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यवतवरुन प्रस्थान ठेवेल. वरवंडमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. केडगाव चौफुलावर कलावंतांकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून अनोखी सेवा करण्यात आली. गेल्या 30 वर्षांपासून हा अनोखा सोहळा वाखरीत आयोजित केला जातोय. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाते. या कला केंद्रातील नर्तिकांकडून लावणीसह अभंगावरील नृत्यांचं सादरीकरण करुन मनोरंजन केलं.





रायगड : उलवा, खारघर , द्रोणागिरी, पेण, पनवेल परिसरातील पाणीपुरवठा आज रात्रीपर्यंत बंद

रायगड : नवी मुंबईतील उलवा, खारघर , द्रोणागिरी, पेण, पनवेल परिसरातील पाणीपुरवठा आज रात्रीपर्यंत बंद राहणार आहे. शनिवारी गव्हाण टाकीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हेटवणेकडून येणारी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सुमारे 25 ते 30 तास पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.





चंद्रपूर : नियंत्रण सुटल्याने खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात

चंद्रपूर : नियंत्रण सुटल्याने खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर तर अन्य काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही ट्रॅव्हल्स गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून नागपूरला जात होती. मूल-चामोर्शी मार्गावरील योग राईस मिल जवळ हा अपघात झाला. मूल पोलिसांनी जखमींना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा : जवान सुरज शेळके (वय 23) यांच्या पार्थिवावर त्याच्या खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुरज यांच्या कुटुंबीयांचा आक्रोष परिसर हेलावणारा होता. लडाख येथे त्यांना वीरमरण आलं. यावेळी खटाव गावासह पंचक्रोषीतील लोक उपस्थित होते.  पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाकडून बंदुकींच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून सुरज यांना मानवंदना देण्यात आली. शहीद सुरज शेळके यांचे वडील प्रताप आणि सुरजचे भाऊ गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची 148 वी जयंती 

लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या 48 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमधील शाहू जन्मस्थळावर शाहू छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


भुमरे-अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन 


कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून आज पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी मतदार संघातील कार्यकर्त्यांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांचे समर्थकांकडून केले जात आहे.


गुवाहाटी मधील शिंदे समर्थकांचा मुक्काम वाढला


हॉटेल रेडिसन मधील बंडखोर आमदारांच्या रुम्सचे बुकिंग 30 तारखेपर्यंत वाढवण्यात आलंय. कायदेशीर लढाई, उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, भाजप सोबत चर्चा याला वेळ लागणार असल्यानं बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीतच थांबण्याची शक्यता आहे.


 शिवसेनेतल्या गटबाजीनंतर राजीनामा नाट्याला सुरुवात


 ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. म्हस्के एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यामुळे, आता आमदारांच्या नाराजीनंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र! अशी फेसबुक पोस्ट नरेश म्हस्केंनी केली आहे. काल ठाण्यात श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या शक्तीप्रदर्शनाच्या वेळी नरेश म्हस्केही उपस्थित होते.


 आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा


"फ्लोर टेस्ट तर होणारच आहे. ज्या दिवशी फ्लोर टेस्ट होईल त्यादिवशी मुंबईत उतरतील. विमानतळावरुन विधानभवनात जाण्याचे रस्ते आपल्या वरळीतून आहेत. वरळी नाहीतर आपल्या परळमधून आहेत. येणार आमच्या वांद्र्यामधून. ही मुंबई आपली आहे. ती दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. कदाचित त्या फ्लोर टेस्टसाठी केंद्र सरकार आर्मी लावू शकतील", असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात काल आदित्य ठाकरे बोललेत. 


 शिवसैनिकांसाठी एकनाथ शिंदेंचं ट्विट


एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे शिवसैनिकांना आवाहन केलंय. प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ.चा खेळ ओळखा..! मविआ अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरता समर्पित आहे अशा स्वरुपाचं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलंय.


देवेंद्र फडणवीस रात्री पुन्हा मुंबई विमानतळाच्या दिशेनं


 देवेंद्र फडणवीस रात्री मुंबई विमानतळाकडे गेल्याची माहिती आहे. परवा रात्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये गुजरातमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. त्यानंतर फडणवीस दिल्लीतही जाऊन जे. पी. नड्डांना भेटल्याची सूत्रांची माहिती आहे.  त्यामुळे, रात्री परत फडणवीस नेमके कुठे गेले हे पाहावं लागेल.


सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अटक 
 
अहमदाबाद- गुजरात दंगल प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तीस्ता सेटलवाड यांना गुजरात क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मुंबईतील जुहू येथील घरातून तीस्ता सेटलवाड यांना सांताक्रुझ पोलिस स्थानकात नेण्यात आलं. त्यानंतर, त्यांना रस्त्यानं अहमदाबादला नेण्यात आलं.


  पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज 'मन की बात' कार्यक्रमातून


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज  26 जून रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून  जर्मनी आणि दुबईच्या दौऱ्यावर 
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 28 जूनपर्यंत जर्मनी आणि दुबईच्या दौऱ्यावर आहेत. मोदी जी 7 शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.