Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला करून तीन दिवस पोलिसांना गुंगारा देणारा हल्लेखोर अखेर गजाआड गेलाय. हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी सीसीटीव्हीत (CCTV) कैद झालेला हल्लेखोराच्या पोलिसांनी ठाण्यातून मुसक्या आवळल्यात. सैफला जखमी केल्यानंतर हल्लेखोर कुठे कुठे गेला, कुठे लपून बसला आणि अखेर पोलिसांच्या हाती कसा लागला? याचा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे.
तीन दिवस पोलिसांशी लपंडाव खेळणाऱ्या मोहम्मद शहजादच्या (Mohammad Shahzad), अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ठाण्याच्या कासारवडलीतल्या हिरानंदानी परिसरातल्या कामगार वस्तीतून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सैफ अली खानच्या या जानी दुश्मनच्या अटकेची कहाणी समजल्यानंतर, त्यावर एखाद्यानं चित्रपट काढला तर आश्चर्य वाटायला नको. या पठ्ठ्याला ठाऊकही नव्हतं की, हा कुण्या बड्या सेलिब्रिटीच्या घरात घुसतोय. गेटवर सिक्युरिटी नसल्यामुळे यानं सहज इमारतीत प्रवेश मिळवला. त्यानंतर घरात घुसून हल्ला केला आणि तिथून पळ काढला.
सैफवरच्या हल्ल्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला आणि एक निवांत झोप काढली. त्यानंतर तो उठला आणि त्यानं वांद्रे स्टेशन गाठलं. सर्वात आधी स्वतःचे कपडे बदलले आणि तिथून दादर गाठलं. तिथून तो वरळीला पोहोचला आणि वरळीहून ठाण्याला गेला, अशी माहिती स्वतः आरोपीनं पोलीस चौकशीतून दिली आहे. पकडलं जाऊ नये यासाठी त्यानं सर्व काळजी घेतली होती. पण, पोलिसांच्या जाळ्यात अडकला तो त्याच्या पाठीवरच्या बॅगेमुळे. आरोपीच्या पाठीवर बॅग होती हे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेरलं होतं. याच बॅगेमुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. पुढे सीसीटीव्ही, डम डाटा आणि ऑनलाइन पेमेंटच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीचा माग काढण्याचा निर्मय घेतला.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपी शहजादचा फोटो घेण्यात आला. त्या फोटोच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांची पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं, पण अखेर पदरी निराशाच आली. हाती काहीच लागलं नाही. मग, पुन्हा वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं.
गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास सैफच्या इमारतीत दिसलेला आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकाकडे पायी जात असताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. गुन्हा घडला त्यावेळी घातलेले कपडे बदलले आणि तो पुढे पळून जाण्याचा विचार करत होता. पण, त्याच्या पाठीवरच्या बॅगेमुळे तो पोलिसांच्या हाती लागला. सकाळी आठच्या सुमारास वांद्रे स्थानकातून लोकल पकडून त्याने दादर गाठलं. त्यानंतर पोलिसांनी दादर, माहीम आणि वरळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी त्यानं दादरच्या एका मोबाईलच्या दुकानात हेडफोन्स खरेदी केल्याचं समजलं.
तिथून तो वरळी कोळीवाड्यात पोहोचला. तेथील एका पब बारमध्ये काम केले असल्याने तो तेथे रात्रभर थांबला. त्याला कामाची गरज होती. त्यासाठी त्यानं हाऊसकिपिंगची कामं मिळवून देणाऱ्या एका व्यक्तीची भेट घेतली आणि तो तिथून निघाला. तिथेच एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तात्काळ आपल्या तपासाची चक्र वेगानं हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीनं ज्या व्यक्तिची भेट घेतली होती, त्याचा माग काढला. त्यानं भुर्जी-पाव खाल्लेल्या गाडीवरही चौकशी केली. पबबारमध्ये चौकशी करून आरोपीचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर त्यानं ऑनलाईन पेमेंट केल्याचंही पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी मध्यरात्री जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या.
पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attack Case | सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचं स्पष्ट
महत्त्वाच्या इतर बातम्या :