Stock Market मुंबई : अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी जगभरातील शेअर बाजारांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. यामुळं आशियाई बाजार तेजीसह कारभार करत आहे. त्यामुळं याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. आज आठवड्याचा पहिला दिवस असल्यानं आजचा कारभार कसा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. भारतीय शेअर बाजार देखील आज तेजीसह उघडला. 


डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील चर्चा सकारात्मक दृष्टीनं पाहिली जात आहे. या चर्चेनंतर टिकटॉकनं अमेरिकेतली सेवा पुन्हा सुरु केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला तीन महिन्यात अमेरिकन खरेदीदार शोधण्याचा जो आदेश दिला होता, त्याला स्थगिती दिली गेल्याची चर्चा सुरु आहे.  त्यामुळं अमेरिकेतील टिकटॉक बंदी केवळ 14 तासांची ठरली आहे. टिकटॉकनं डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार देखील मानले आहेत. अमेरिकेतील टिकटॉकला मदत करणाऱ्यांवर पुढील आदेशापर्यंत दंड लावला जाणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं. 



आशियाई बाजारातील तेजीनंतर भारतीय शेअर बाजारात देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. आशियाई बाजारात Nikkei 225 हा 1.31 टक्क्यांच्या तेजीसह  कारभार करत असल्याचं पाहायला मिळालं. कोस्पीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. भारतीय शेअर बाजार आज सुरु झाला तेव्हा तेजीसह उघडला. निफ्टी 50, बँक निफ्टी, बीएसई सेन्सेक्सवर तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 50 सध्या 23227 अंकांच्या दरम्यान ट्रेड करत आहे. बीएसई देखील 76720 अंकांच्या दरम्यान ट्रेड करत आहे. 



डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील चर्चेकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं जात आहे.  त्यामुळं अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारासंदर्भातील संघर्ष थांबण्याची चिन्ह आहेत. जागतिक बाजाराची नजर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरच्या निर्णयांवर राहणार आहे. 


  
भारतीय बाजारासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, जानेवारी महिन्यात आतापर्यंत जवळपास 44396 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांकडे लक्ष राहील. त्याप्रमाणं कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर देखील बाजाराचं लक्ष असेल. पुढील आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळं बाजारात अर्थसंकल्पपूर्व घडामोडी पाहायला मिळू शकतात. भारतीय शेअर बाजारात एकीकडे विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून विक्रीचं सत्र सुरु आहे. दुसरीकडे भारतीय गुंतवणूकदार जोरदार खरेदी करत आहेत. 


इतर बातम्या :



(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)