Hutatma Express : गुड न्यूज! भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सुरू होणार, दोन वर्षानंतर अखेर मुहूर्त
Hutatma Express : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात अनेकांचे हाल झाले. वाहतुकीची अनेक साधने बंद असल्याने प्रवासही बंद होता.
Hutatma Express : कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात अनेकांचे हाल झाले. वाहतुकीची अनेक साधने बंद असल्याने प्रवासही बंद होता. नाशिक पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्वाची भुसावळ-नाशिक-पुणे ही सेवाही बंद होती. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही सेवा लवकरच पूर्ववत करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे दुसऱ्या अनलॉकनंतर अमृतसर एक्स्प्रेस, खान्देश एक्स्प्रेस, नंदुरबार-पुणे एक्स्प्रेस आदी गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र हुतात्मा एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस व हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या महत्वाच्या गाड्या अद्याप सुरू करण्यात आल्या नव्हत्या. विशेषतः प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली हुतात्मा एक्स्प्रेसही अद्याप सुरू न करण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत होती. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस कधी सुरू होणार ? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात होता. अखेर आता सव्वादोन वर्षांनंतर हुतात्मा एक्सप्रेस धावणार आहे.
दोन वर्षानंतर अखेर मुहूर्त
कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 पासून बंद करण्यात आलेली भुसावळ-नाशिक-पुणे रेल्वे सेवा 10 जुलैपासून दोन वर्षाच्या खंडानंतर सुरु होत आहे. हक्काची नाशिक-पुणे गाडी सुरु होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ही गाडी सुरू होत असल्याने नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होणार आहे. तसेच रेल्वेस्थानकातील कुली, रिक्षा व छोटे मोठे व्यावसायिक यांनाही रोजीरोटी मिळणार आहे.
रेल्वेगाड्या हळूहळू पूर्वपदावर
रेल्वे मंत्रालयाने करोनाच्या संकटामुळे रेल्वेने खबरदारी म्हणून अनेक रेल्वेगाड्या बंद केल्या होत्या. त्यातील काही रेल्वेगाड्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र, त्या सर्वांना रिझर्व्हेशन सक्तीचे आहे. तिकीटही जास्त असून रिझर्व्हेशनसाठी वेळही जास्त लागत आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पंचवटीसारख्या इंटरसिटी ट्रेनला रिझर्व्हेशन एवजी जनरल करण्यात आले आहे. आणखी काही गाड्या जनरल करण्यास सुरुवात झाली आहे. इगतपुरी-भुसावळ ही पॅसेंजर गाडी मेमू ट्रेनच्या स्वरुपात काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. पुण्याला जाताना ही गाडी पहाटे नाशिकला येते. तेथून सुमारे सहा तासांनी पुण्याला पोहोचते. ही गाडी सध्या बंद असल्यामुळे नाशिककरांना बस आणि खासगी वाहनाने पुणे गाठावे लागत आहे.
रस्ता प्रवास नको रे बाबा!
दरम्यान रस्ते प्रवासापेक्षा नाशिक-पुणे रेल्वेगाडी स्वस्त आहे. रेल्वेपेक्षा रस्तामार्गे किमान तिप्पट भाडे लागते. शिवाय स्पेशल चारचाकी गाडी केली तर हा खर्च अनेक पटींनी वाढतो. याशिवाय खासगी वाहनाने जाताना मंचर, चाकणपासून पुणे येईपर्यंत वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे इंधनही जास्त खर्च होते. पुण्याहून रस्ता मार्गे नाशिकला येताना एक-दोन तास वाहतूक कोंडीतच जातात. त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो. शिवाय महामार्ग असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रेल्वेचा आरामदायी प्रवास
शिवाय काही जण पंचवटी, राज्यराणीसारख्या गाडीने कल्याणला उतरून तेथून पुण्याला जाणारी रेल्वेगाडी पकडतात. परंतु, यामध्ये खूप वेळ जात असल्याने अनेकदा जागा मिळत नाही. मात्र आता गाडी सुरू होत असल्याने प्रवास आरामदायी होणार आहे.
बाजारपेठा व उद्योग-व्यवसाय सुरू
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. 22 मार्च 2020 पासून बंद झालेली भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस अखेर 17 जून पासून शासनाने निर्बंध उठविल्या नंतर सर्व प्रकारच्या बाजारपेठा व उद्योग- व्यवसाय सुरू झाले आहेत. या मध्ये महामंडळातर्फेही पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यात आलेल्या होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारच्या अनेक महत्वाच्या गाड्या अद्यापही सुरू केलेल्या नव्हत्या. यामध्ये पॅसेंजर गाड्यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. भुसावळ विभागातून मुख्यतः हुतात्मा एक्स्प्रेस गेल्या वर्षापासून बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. रेल्वे प्रशासनाने इतर गाड्या सुरू केल्या असतांना,भुसावळ विभागातील इतर महत्वाच्या गाड्या का सुरू केलेल्या नाहीत, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत होता.