(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 18 May 2022 : Raj Thackeray: पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार: मनसे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
1682 : मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती, छत्रपती शाहूराजे भोसले यांची जयंती
थोरले शाहू महाराज यांचा जन्म 18 मे मे 1682 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव होते. जन्मापासूनच ते मोंगल बादशहा औरंगजेबाच्या त्याब्यात होते. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूंना सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी 1707 पासून ते मरेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबर 1749 पर्यंत राज्य चालविले. साताऱ्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई.
1913 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांची जंयती
पुरुषोत्तम केशव काकोडकर यांचा जन्म 18 मे 1913 रोजी झाला. कोकोडकर हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील होते. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता.
1933 : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची जयंती
सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला. सिविल इंजिनीरिंग पदवी धारक देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला. 11 डिसेंबर 1994 रोजी ते कर्नाटकाचे 14 वे मुख्यमंत्री बनले. 30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
1048 : पर्शियन कवी उमर खय्याम यांची जयंती
उमर खय्याम हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आणि कवी होते. ईशान्य इराणमधील निशापूर येथे जन्मलेल्या खय्याम यांनी आपले बहुतेक आयुष्य कारखानिद आणि सेल्जुक शासकांच्या दरबारात घालवले.
1872 :इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ बर्ट्रान्ड रसेल यांची जयंती
1897 : अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक फ्रॅंक काप्रा यांची जयंती
1931 : अमेरिकन व्यंगचित्रकार डॉन मार्टिन यांची जयंती
1979 : माईनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गेंस्टन यांची जयंती
2017 : जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांची पुण्यतिथी
रीमा लागू यांचा जन्म मुंबईतील गिरगांव येथे 21 जून १९५८ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटांमधील तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम चांगलेच गाजले. 18 मे 2017 रोजी त्यांच निधन झाले.
1846 : मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी
आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे 20 जानेवारी 1822 रोजी झाला. त्यांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. 1825 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी आणि संस्कृतचे शिक्षण घेतले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले.
मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 18 मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.
1997 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांची पुण्यतिथी
भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई कामत ओळखल्या जातात. प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले व प्रसिद्ध तबला वादक लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले यांच्या त्या आई होत. त्याचप्रमाणे आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या त्या आजी. 6 सप्टेंबर 1901 रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. तर 18 मे 1997 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
2015 : भारतीय परिचारिका अरुणा शानबाग यांची पुण्यतिथी
अरुणा रामचंद्र शानबाग यांचा 1 जून 1948 रोजी झाला. एक भारतीय परिचारिका म्हणून त्यांची ओळख होती. 1973 मध्ये परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल भरत वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला होता. या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा फास आवळला गेल्याने त्या निश्चल अवस्थेत गेल्या होत्या. जवळपास 42 वर्ष मृत्यूशय्येवर घालवल्यानंतर अरुणा शानबाग यांचे 18 मे 2015 रोजी मुंबईत निधन झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ केल्यानंतर आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे कायमस्वरुपी गंभीर नुकसान केले आहे. या अन्यायाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केली.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन समिती स्थापन करणार
शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते सोलापुरात दाखल
ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर बचावासाठी आंदोलन
बालगंधर्व रंगमंदिर बचावासाठी पुणे शहरातील कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मोहन जोशी, रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
Raj Thackeray: पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार: मनसे
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील सभा होणार असल्याच मनसेकडून सांगण्यात आले आहे. फक्त ही सभा खुल्या मैदानात होणार नसून पावसाची शक्यता लक्षात घेता ती पुढील आठवड्याच्या शेवटी बंदिस्त सभागृहात घेण्याच मनसेकडून नक्की करण्यात आले आहे. पण या सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण हे राज ठाकरे स्वतः जाहीर करतील अस मनसेकडून सांगण्यात आलं आहे.