Maharashtra Breaking News 11 July 2022 : Shivsena : शिवसेनेच्या 11 खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली?
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूरः जिल्ह्यात सोमवारी प्राप्त अहवालानुसार 67 नव्या कोरोना (Covid) बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 57 तर ग्रामीण भागातील 10 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या बाधितांसह जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या 809वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 21 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही बंड करण्याच्या तयारीत असून 11 खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याच्या दिवशीच या खासदारांनी भेट घेतल्याचं आता समोर येत आहे.
अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहराबाहेरील बायपास परिसरात एका तरुणाकडून चार गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. औरंगबादच्या गंगापूर येथील महेश काळे हा युवक नगर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील बायपास चौकात सापळा रचून महेश काळेला ताब्यात घेतले. महेश काळे याच्याकडून चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत कडतुस हस्तगत करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत अनेक गावठी कट्टे पकडलेत. या गावठी कट्ट्यांचे कनेक्शन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये जात असून त्या ठिकाणावरून हे कट्टे अहमदनगर जिल्ह्यात विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या (Vijay Mallya) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह 4 कोटी डॉलर (सुमारे 31,76,42,000 रुपये) जमा करण्याचे निर्देश दिले आहेत, असे न केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल.
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन पूर आल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देत सांगितलं की, लष्कराकडून 4000 रहार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे. दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा
थेऊर परिसरातील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सापडलेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपासात तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले. वैशाली लाडप्पा दुधवाले असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. सध्या ती भीमा कोरेगाव येथे राहत होती. तिचा प्रियकर महेश पंडित चौघुले याला पोलिसांनी अटक केली असून तोही मूळचा उस्मानाबादचा आहे.
कुख्यात गँगस्टर अबू सलेमला दिलेली शिक्षा योग्यच, असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जन्मठेपेविरोधात सलेमनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. 25 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा दिल्याच्या निर्णयाला आव्हान देता याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अबू सलेमला दिलेली शिक्षा योग्यच असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दणका बसला आहे. देशमुखांना सीबीआय प्रकरणात डीफॉल्ट जामीन नाकारण्यात आला आहे. देशमुखांसह कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांनीही जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने निकाल देत जामीन नाकारला आहे.
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात खासगी शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. रस्त्याकडेला असलेल्या शेतात बस पलटी झाली. अरुंद रस्ता असल्याने आळवे गावाच्या अलीकडे रस्त्याकडेला असलेल्या शेतात बस पलटी झाली. बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, सर्वांना आपत्कालीन दरवाजमधून बाहेर काढण्यात आलं.
Amarnath Yatra LIVE : अमरनाथ गुहेच्या परिसरातील हवामानात काहीशी सुधारणा झाल्याने ज्या भाविकांना हेलिकॉप्टरद्वारे तिथे पोहोचायचं आहे अशांसाठी आजपासून हेलिकॉप्टरची सुविधा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र पायी यात्रेला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र हेलिकॉप्टरद्वारे यात्रा सुरु झाल्याने लवकरच पायी यात्राही सुरु होईल, अशी बालाटाल परिसरात प्रतीक्षा करणाऱ्या हजारो भाविकांना आशा आहे.
देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनारुग्ण सापडले आहेत, त्यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे. 16 हजार 678 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 30 हजारांच्या पार गेली आहे. तर कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्यानेही पाच लाख 25 हजारांचा आकडा पार केला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, कोर्टात सुनावणी होईपर्यंत निर्णय नको, सुप्रीम कोर्टाच्या सूचना
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना (ShivSena MLA) धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सध्या अॅक्टीव्ह मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील शेतकर्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणं मिळावं तसेच रासायनिक खते आणि कीटकनाशके आवश्यकतेनुसार मिळावीत यासाठी जिल्ह्यात असणार्या 2 हजार 192 कृषी केंद्राची तपासणी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 386 मंडळांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 40 कृषी केंद्रांवर कारवाई करत विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे.
अमरनाथ गुहेजवळ 08 जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे 40 जण बेपत्ता आहेत. तर जखमींवर उपचार सुरु आहेत. अमरनाथमधून 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट पाहा.
शिवसेनेचे 15 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे. विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करुन निकाल पाहता येईल.
राज्यातील सरकार बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही, न्यायालयावर आमचा विश्वास, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार असल्याचे दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दराचा परिणाम भारतातील इंधन दरावर झाला नाही. आज सरकारी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल (Petrol), डिझेलचे दर जाहीर केले आहेत. इंधन कंपन्यांनी आजही इंधन दर (Petrol-Diesel Price) स्थिर ठेवले आहेत.
कोल्हापुरात डॉक्टर तरुणीनं स्वतःच इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डॉ. अपूर्वा हेंद्रे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचं नाव आहे. तरुणीनं मध्यरात्री त्यांनी इंजेक्शनचा जास्त डोस घेऊन आत्महत्या केली. कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी भागात सकाळी तरुणीचा मृतदेह आढळला. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तरुणीनं यापूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे. बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का बांगर यांना दिला गेला आहे.
देव तारी त्याला कोण मारी या वाक्याचा प्रत्यय धुळे शहरातील अमरनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या भाविकांना आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया या भाविकांनी व्यक्त केली आहे. या भाविकांनी त्यांनी अनुभवलेल्या कठीण प्रसंगाबाबत देखील सांगितले. प्रवीण अग्रवाल हे त्यांच्या मित्र परिवारासह दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. यावेळी या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना तिथून लवकर निघून जाण्याची बाबत सांगितले, प्रवीण अग्रवाल हे त्यांच्या मित्रपरिवारासह अवघ्या काही वेळातच तिथून बाहेर पडल्यानंतर ही ढगफुटीची घटना घडली.
गेल्या वर्षी कोकणात अतिवृष्टीनं (Konkan Rain Updates) हाहाकार माजवला होता. या अतिवृष्टीनं गावच्या गावं पाण्याखाली गेली होती. सोबतच काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी देखील झाली होती. चिपळूणमधील पेढे - कुंभारवाडी परशुराम गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या प्रकरणी 9 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. नागपुरातून लवकरच काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार आहे, या प्रकल्पाला रेल्वे बोर्डाची देखील मंजुरी मिळाल्याचं गडकरी म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cloudburst) ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून (Base Camp) यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता
महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सुनावणी आज होणार की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. कामकाजात समाविष्ट नसेल तर वकील आज सकाळी न्यायालयासमोर हे मॅटर मेन्शन करतील. त्यानंतर सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होईल. सकाळी मेन्शन केलेलं मॅटर त्याच दिवशी सुनावणीला येण्याची शक्यता खूप कमी असते. आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि या प्रकरणातील इतर याचिकांची सुनावणी 11 तारखेला होणार असं सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं होतं.
सुप्रीम कोर्ट कुठली बाजू मानणार? उपाध्यक्षांची की सचिवांची?
सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिलं आहे. अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे काही नियमबाह्य वर्तन नाही. ही मुदत प्रथम दर्शनी दिलेली होती त्यावर आमदारांनी कुठल्याही पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले याचं आश्चर्य वाटलं, असं उत्तर झिरवाळांनी दिलंय. दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केलंय. नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यामुळे आता अपात्रतेचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे, उपाध्यक्ष म्हणतात ती 48 तासांची मुदत नियमबाह्य आहे असं सचिवांनी या शपथपत्रात म्हटलं आहे.
गोव्यातल्या काँग्रेस आमदारांचं बंड फसलं?
गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या 11 आमदारांपैकी 5 जण काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटले. मात्र, नवीन गट स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत असणं आवश्यक आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव काल गोव्यात दाखल झाले आहेत. विधानसभेचं कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे.
अवमानता प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज विजय माल्याला शिक्षा सुनावणार आहे. गेले पाच वर्ष न्यायालयासमोर हजर न झाल्यानं त्याला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं विजय माल्याला या प्रकरणी जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
पुढचे 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
आज रायगड, रत्नागिरी, पालघर, सातारा, पुणे, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह उर्वरीत कोकणात आणि विदर्भाच्या काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गडचिरोली- गेले दोन दिवस जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आजपासून पुढचे दोन दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे तीन दिवस जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील. शासकीय कार्यालये सुरु राहतील.
पुणे- सतत पडणाऱ्या पावसामुळे खडकवासला धरण साखळीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
सातारा- प्रशासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आजसाठी जाहीर करण्यात आला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा आणि इतर भागातील पावसाची तीव्रता वाढली आहे.
सांगली- यंदा कृष्णा नदीच्या अगोदरच वारणा नदीने पात्र सोडलं आहे. कारण शिराळा तालुक्यात आणि खासकरुन चांदोली धरण क्षेत्रात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. यामुळे वारणा नदी परिसरातील भात शेती, ऊस शेती पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे कृष्णा नदी पात्र परिसरात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू नसल्याने कृष्णा अजूनतरी नदी पात्रातूनच वाहतेय.
नाशिक- दोन दिवसांच्या धुवांधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. नाशिककरांवरील संभाव्य पाणीकपातीचे संकट टळले आहे.
अमरनाथमध्ये रेस्क्यू सुरुच, 41 नागरिक अजूनही बेपत्ता
अमरनाथमधील ढगफुटीनंतर आतापर्यंत 16 नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. 41 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. 98 जण जखमी झालेत तर 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरु आहे. या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती देण्यासाठी आज एअरफोर्सची श्रीनगर विमानतळावर पत्रकार परिषद होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -