पुणे: पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ काल दुपारी (बुधवारी) खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आले आहेत. मृतदेहांची अवस्था पाहता, मुलींसोबत अत्याचार झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. राजगुरुनगर पोलीसांनी दोन्ही मुलीचे मृतदेह शवच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलीसोबत काय झाले याचा तपास पोलीस करत होते. पिडित मुलींच्या शेजाऱ्यानेच हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 आणि 9 वर्षांच्या दोन बहिणी होत्या. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने तिने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रम मध्ये मृतदेह ठेवले.
राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर दोन्ही बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवले आहेत, या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल.
लोणावळ्याच्या पोलिसाचे दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकचं भक्षक बनल्याचं दिसून येत आहे. एका पोलीस शिपायाने चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार नाताळ दिवशीचं घडला आहे.
नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली आणि त्याने जेवण केलं. त्याच भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला. या नराधम पोलीस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.