Vijay Mallya : 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड, विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाकडून शिक्षा
Vijay Mallya News : फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रकरणात चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नवी दिल्ली : फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या (Vijay Mallya) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 2 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने मल्ल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह 4 कोटी डॉलर (सुमारे 31,76,42,000 रुपये) जमा करण्याचे निर्देश दिले आहेत, असे न केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल.
9 हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी विजय मल्ल्याविरुद्ध अवमान खटल्यातील शिक्षेबाबत युक्तिवाद झाल्यानंतर 30 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील न्यायालयीन सल्लागार जयदीप गुप्ता यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याच्या वकिलांना या प्रकरणी लेखी युक्तिवाद करु शकतात असं सांगितलं होतं. न्यायालयाच्या सल्लागाराने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, "मल्ल्याला न्यायालयाची नोटीस मिळाली असेल अशी अपेक्षा करायला हवी." यादरम्यान त्यांना नोटीसबद्दल माहिती देण्यात आली होती आणि त्यांच्याकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत, असं मल्ल्याचे वकील अंकुर सैगल यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अनेक संधी दिल्यानंतरही मल्ल्या हजर झाला नाही, त्यामुळे पुढील कारवाई करावी, असं न्यायालयाच्या सल्लागाराने म्हटलं होतं. "विजय मल्ल्याकडे बँकेचे 9,000 कोटी रुपये थकित आहेत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे," असा युक्तिवाद न्यायालयीन सल्लागार जयदीप गुप्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मल्ल्याच्या शिक्षेवर केला होता.
9 जून 2017 रोजी, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन, मल्ल्याने 40 दशलक्ष डॉलर त्याच्या तीन मुलांच्या नावे हस्तांतरित केले होते. त्यानंतर तो न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला. मल्ल्याला 2017 मध्ये अवमान प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होत. तर आज (11 जुलै) शिक्षा सुनावली.
Vijay Mallya 4 महिन्याचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांचा दंड, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षा
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
