Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात 1 हजार 386 कृषी केंद्रांची तपासणी, 40 कृषी केंद्रांवर कारवाई
अहमदनगर जिल्ह्यात असणार्या 2 हजार 192 कृषी केंद्राची तपासणी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 386 मंडळांची तपासणी करण्यात आली आहे.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग सध्या अॅक्टीव्ह मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यातील शेतकर्यांना दर्जेदार, प्रमाणित बियाणं मिळावं तसेच रासायनिक खते आणि कीटकनाशके आवश्यकतेनुसार मिळावीत यासाठी जिल्ह्यात असणार्या 2 हजार 192 कृषी केंद्राची तपासणी सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 386 मंडळांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 40 कृषी केंद्रांवर कारवाई करत विक्री बंदचा आदेश देण्यात आला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळं शेती कामांना देखील वेग आला आहे. शेतकरी खते बियाणे यांची खरेदी करण्यासाठी कृशी केंद्रावर गर्दी करत आहेत. अहमदनगरमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं यंदा 15 पथके तयार केली आहे. यामध्ये 14 तालुक्यांच्या ठिकाणी आणि एक मुख्यालयातील तपासणी पथकचा समावेश आहे. या पथकामार्फत कृषी केंद्रांची तपासणी करुन खते, बियाणे, किटकनाशके योग्य भावात विक्री होते की नाही हे तपासले जात आहे. कृषी निविष्ठा कालबाह्य तर नाहीत ना, त्यांची मुदत संपलेली आहे का, शेतकर्यांना विक्रीचे बिल दिली जातात का, स्टॉक रजिष्ठरनुसार माल आहे का, परवानगी नसणार्या बियाणे, खते, किटकनाशकाची विक्री तर होत नाही ना या बाबी तपासल्या जात आहेत. यात काही त्रुटी असल्यास थेट संबंधीत कृषी केंद्रावर करवाई केली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 192 कृषी केंद्रापैकी 1 हजार 386 कृषी केंद्राची तपासणी जिल्हा परिषदेच्या पथकाने केली आहे. यामध्ये 40 केंद्रात त्रुटी आढळल्याने त्या केंद्रांना विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
तालुका आणि तपासणी झालेल्या कृषी केंद्राची संख्या
संगमनेर तालुक्याती 165 कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तर राहाता 95, कोपरगाव 126, अकोले 72, राहुरी 150, नेवासा 220, पाथर्डी 65, नगर 85, कर्जत 70, पारनेर 73, श्रीगोंदा 65, शेवगाव 63, आणि जामखेड तालुक्यातील 55 कृषी केंद्रांची तपासणी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: