(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 10 July 2022 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज आषाढी एकादशी
आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.
मुख्यमंत्र्यांचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
- मध्यरात्री 2 वाजता - मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहाहून विठ्ठल मंदिराकडे निघणार.
- मध्यरात्री 2.30 वाजता - शासकीय महापूजा
- पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन
- पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण
- सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ
- सकाळी 11.45 वाजता - पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये शिवसेना मेळावा
आज पंढरपूर येथे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
आषाढी एकदशीचे राज्यभरातील कार्यक्रम
मुंबई- प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदीरात भाविकांची गर्दी होणार आहे. कोरोनाच्या संकंटानंतर मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
अहमदनगर- जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धुळे - शहरातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडात बांधण्यात आलेल्या मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षांच्या कालखंडानंतर गर्दी होणार असून या ठिकाणी यात्रा भरते.
शिर्डी- आषाढी एकादशी व रविवार असल्यानं पंढरपूरप्रमाणे शिर्डीत सुद्धा भक्तांची गर्दी होईल.
अमरावती- विदर्भातील हजारो भाविक आषाढी एकादशीला विदर्भाची पंढरी कौडण्यपूरमध्ये येणार. ज्यांना पंढपुरला जाणं शक्य होत नाही असे विदर्भातील हजारो वारकरी विठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूर येथे दर्शनाला येतात.
आज देशभर बकरी ईदचा उत्साह
आज देशभर बकरी ईद साजरी केली जाणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 व्या दिवशी ही ईद साजरी केली जाते. आजच्या दिवशी नमाजचे पठण केल्यानंतर कुर्बानी देण्यात येते.
अमरनाथमधील रेस्क्यू सुरुच
अमरनाथमधील ढगफुटीनंतर मृतांची संख्या 16 झाली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध आणि रेस्क्यू अजूनही सुरु आहे. आज किंवा उद्यापासून पुन्हा अमरनाथ यात्रेला सुरुवात होईल.
श्रीलंकेतील आंदोलन तीव्र, पंतप्रधानांचं खाजगी निवासस्थान आगीच्या भक्ष्यस्थानी
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी रात्री त्यांचं खासगी निवासस्थान पेटवून दिलं. राष्ट्रपती गोटाबाया राष्ट्रपती भवन सोडून पळून गेल्यानंतर अजूनही त्यांच्या घरावर आंदोलकांचा ताबा आहे. गोटाबाया 13 जुलैला राजीनामा देणार आहेत.
शिंजो आबे यांच्या हत्येनंतर आज जपानमध्ये मतदान
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं शव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. आज जपानमध्ये संसदेच्या वरिष्ठ सदनाचं मतदान पार पडणार आहे.
आजही महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांचा दिल्ली दौरा, ओबीसीच्या मुद्द्यावर वकिलांची भेट
माजी मंत्री छगन भुजबळ आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. भुजबळ ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांच्या भेटी घेणार आहेत. तसेच, सैनी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला देखील उपस्थिती लावणार आहेत. भुजबळ देशातील काही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात महत्वपूर्ण घोषणा...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात महत्वपूर्ण घोषणा...
लवकरच नागपुरातून काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार, रेल्वे बोर्डाची प्रकल्पाला आजच मिळाली मंजुरी...
नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत, आजच मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे असे गडकरी म्हणाले ..
पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली...
ते नागपूर आतील मिनी माता नगर परिसरात काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते....
मनसेला मंत्री मंडळात स्थान दिल्यास आरपीआयचा विरोध - रामदास आठवले
नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती .याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही ,त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही ,तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार असे सांगितले
सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे उत्तर
सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिले आहे. अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे नियमबाह्य वर्तन नाही. ही मुदत प्रथम दर्शनी दिलेली होती. त्यावर आमदारांनी कुठल्याही पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले याचं आश्चर्य वाटलं. अज्ञात ई-मेलवरून आणि एका अनोळखी व्यक्तीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्याने त्यावर कार्यवाही केली नाही असाही निर्वाळा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी, चार तासापासून आंबोलीत वाहतूक कोंडी
पावसाळ्यात पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडले आहेत. सिंधुदुर्ग येथील अंबोली येथे नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे गेल्या चार तासापासून आंबोलीत ट्रॅफिक जाम झाले आहे. आंबोलीतील ट्राफिक सुरळीत होण्यासाठी अजूनही तीन तास लागण्याची शक्यता आहे.
आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रॅफिकमुळे त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना तीन ते चार तास ट्रॅफिक मध्ये अडकून प्रवास करावा लागतोय. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
आंबोलीत आलेल्या पर्यटकांच्या बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे ट्राफिक जाम झाले आहे. पोलीस प्रशासन, गावकरी आणि वनविभागाने घेतलेल्या बैठकीतील निर्णय कागदावरचं असल्याचे दिसतेय. आंबोलीत पर्यटकांच्या गाड्या पार्क करून रिक्षा किंवा बसने मुख्य धबधब्यापर्यंत परडकांना सोडण्याचा निर्णय कागदावरच झालाय. प्रत्यक्षात मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही
महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची सुनावणी उद्या होणार की नाही याबद्दल अद्यापही अनिश्चितता
11 जुलैच्या सुनावणीवर अवलंबून आहे शिंदे सरकारचे भवितव्य
पण अद्याप हे प्रकरण उद्याच्या कामकाजामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही
कामकाजात समाविष्ट नसेल तर वकील उद्या सकाळी कोर्टासमोर हे मॅटर मेन्शन करतील त्यानंतर सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होईल
सकाळी मेन्शन केलेलं मॅटर त्याच दिवशी सुनावणीला येण्याची शक्यता खूप कमी असते
त्यामुळे हे प्रकरण कधी सुनावणीला येतं हे पाहणं महत्त्वाचं