Load Shedding : महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचं संकट, वीजपुरवठ्याचा तुटवडा; मागणी वाढल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग
Electricity Board : राज्यात पावसाने मारलेली दडी आणि दुसरीकडे वीजेची वाढलेली मागणी यामुळे राज्यात रोज अर्धा तास ते दोन तासांचे लोडशेडिंग सुरू आहे.
औरंगाबाद: कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसणार असून राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून मागणी वाढल्याने आणि तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात इमर्जन्सी लोडशेडिंग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आता रोज अर्धा तास ते दोन तासांच्या लोडशेडिंगला सामोरं जावं लागणार आहे.
राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा वाढला आहे. याचा परिणाम हा विजेचा तुटवडा निर्माण होण्यावर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन लोडशेडिंग करण्यात येत आहे. विजेची मागणी जशी वाढेल त्यानुसार हा लोडशेडिंग करण्यात येत आहे. कधी अर्धा तास, कधी एक तास तर कधी दीड तासांपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत आहे. वाढीव मागणी कमी झाली किंवा पाऊस पडल्यास आल्यास लोडशेडिंग आपोआप बंद होईल असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
राज्यात गेल्या एका महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी उभी पिकं हातची जाण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पिकांना विहिरीतील पाण्यावर जगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत होत नाही. याबरोबरच महावितरणकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा केला जात नाही. एकीकडे कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे तर दुसरीकडे महावितरणकडून त्यांना वीज पुरवठा नीट होत नसल्याने काळजी वाढली आहे.
राज्यावर दुष्काळाचं सावट
मान्सूनच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्ट अखेरपर्यंत देशातील पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
हवामान विभागानं देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.
ही बातमी वाचा: