Kokan Rain : कोकणात पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली पाण्याची इशारा पातळी, खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश
Kokan Rain : चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

Kokan Rain : रत्नागिरी जिल्ह्यात आज तुफान पावसाला सुरुवात झाली. चिपळूणमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. गेले तीन तास पडलेल्या पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणी साचलंय. शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहे.. दरम्यान सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पात्रात वाढ होत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. गावात, रस्त्यांवर पाणी साचत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढत आहे.
रत्नागिरीतील लांजा तालुक्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. तर मंडणगड तालुक्यालाही पावसाने चांगलच झोडपलंय, तालुक्यातील भिंग्लोली आणि समर्थनगर येथे पावसाचे पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. जगबुडी आणि काजळी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे.
संबंधित बातम्या :
Kokan Rain : कोकणात मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai Rain Update : मुंबईकरांनो सावधान! पावसाचा धोका वाढला, यलो अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट जारी























