Kokan Rain : कोकणात मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागिरकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Kokan Rain : कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनान केले आहे.
Kokan Rain : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनान केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी , अर्जुना नदीला पूर
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड, खेड याभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. लांजा तालुक्यातील विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर आंजणारी वरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे जवळच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले. राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीला देखील पूर आलेला चित्र सध्या आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पावसात जोर कायम राहिल्यास शेतीचा देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
चिपळूणमध्ये गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस
चिपळूणमध्ये गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बाजारपेठेतही पाणी साचण्यास सुरुवात झाली.
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कापसाळ सुर्वेवाडी येथील महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. अपुऱ्या चौपदरीकरणाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे. महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे पावसाचे पाणी तुंबले आहे.. या पाण्यातून सध्या जीव मुठीत घेउन प्रवासी प्रवास करत आहेत.
मुंबई गोवा महामार्ग ठप्प
दोन दिवसापूर्वी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतूकीसाठी घाट बंद करण्यात आला होता.. पर्यायी लोटे - कळबस्त्र - चिरणी चिपळूण मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती.. परंतु आज पडलेल्या पावसामुळे पर्यायी मार्गावर दोन मोठ्या गाड्या फसल्याने हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे..
बांदा - वाफोली रस्ता पाण्याखाली, वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने वैभववाडीमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं त्यामुळे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तर बांदा वाफोली रस्ता पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला काही काळ पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.