HSC Examination : बारावीच्या प्रश्नपत्रिकेत बोर्डाचा घोळ सुरूच; इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत चूक
HSC Examination : बारावी परीक्षेतील घोळ सुरूच असल्याचे चित्र आहे. इंग्रजीनंतर आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली असल्याची बाब समोर आली आहे.
HSC Examination : महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचे समोर आले होते. हा घोळ निस्तरत असताना आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार करण्यात येत आहे. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायांना चुकीचे आकडे देण्यात आल्याने नेमकं उत्तर काय लिहावे, असा प्रश्नच विद्यार्थ्यांना पडला होता.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे मंगळवारीच उघडकीस आले होते. आज हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे उपप्रश्न क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.
नेमकं काय झालं?
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले आहेत. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते.
इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत घोळ
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.
संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत आहेत. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करणार आहेत.
औरंगाबाद विभागात कॉपीची 32 प्रकरणं; सर्वाधिक 17 जण जालन्यातील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर झाला. या परीक्षेत औरंगाबाद (मराठवाडा) विभागातून एकूण 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर यासाठी प्रशासनाने एकूण 430 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद (मराठवाडा) विभागात पहिल्याच पेपरला कॉपीची 32 प्रकरणे आढूळन आली आहेत. ज्यात सर्वाधिक 17 कॉपीची प्रकरणे जालना जिल्ह्यात समोर आली आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI