(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Success Story: जन्मत: दृष्टी गमावली...पण मेहनत, जिद्दीच्या जोरावर तेजश्रीने खेचून आणले डोळे दिपवणारे यश!
Nashik News : जन्मत: असलेल्या अंधत्वावर मात करत तेजश्रीने बारावीत 83.17 टक्के गुण मिळवले. तिच्या या यशाचे कौतुक करण्यात येत आहे.
Nashik News : माणसाकडे जिद्द आणि इच्छित ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असेल तर त्याला यश मिळते, असे म्हणतात. नाशिकमधील विद्यार्थीनी तेजश्री दुसाने हिचीदेखील अशीच काहीशी गोष्ट आहे. जन्मत: असलेल्या अंधत्वावर मात करत तेजश्रीने बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले. बारावीच्या परीक्षेसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांचा मोठा आधार तिला मिळाला. दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर नाशिकमधील (Nashik) तेजश्री दुसानेने (Tejashree Dusane) कॉमर्स शाखेत 83 टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
दोन दिवसांपूर्वी बारावी परीक्षेचा (12th Exam) निकाल लागला. अनेकांनी परिस्थितीवर मात करत उत्तुंग असे यश मिळवले. नाशिकमध्ये (Nashik) देखील असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता परीक्षेला सामोरे जात उत्तीर्ण झाल्याचे दिसून आले. अशीच एक विद्यार्थिनी म्हणजे तेजश्री दुसाने होय. तेजश्री दुसाने या एका खास विद्यार्थीनीने 83.17 टक्के गुण मिळवत यश संपादन केले असून सध्या तिच्यावर सर्वच स्तरातून कौस्तुकाचा वर्षाव होत आहे. केटीएचएम महाविद्यालयात ती दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आली आहे.
नाशिक शहरातील म्हसरुळ (Mhasrul) परिसरात राहणारी केटीएचएम महाविद्यालयाची विद्यार्थिनी तेजश्री दुसाने. तेजश्रीने बारावीत 83.17 टक्के गुण मिळवताच तिच्या कुटुंबाला आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि यामागील कारणही तसंच आहे. तेजश्री ही ईतर सर्वसाधारण मुलं - मुलींप्रमाणे नसून तिला 60 टक्के अंधत्व आहे. तेजश्रीला जन्मतःच दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता, तसेच तिचे डोळे पंख्यासारखे गोल गोल फिरायचे, असे तिचे आई वडील सांगतात. तेजश्रीवर उपचार व्हावेत. यासाठी आई वडीलांनी अनेक डॉक्टरांकडे धाव घेतली होती, दीड वर्षाची होईपर्यंत तिच्या डोळ्यांवर तीन वेळेस शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.
सीए होण्याचं स्वप्न
तेजश्रीची दृश्यमानता फक्त 40 टक्के असल्याने तिला कॉलेजमध्ये म्हणा किंवा क्लासमध्ये बेंचवर बसून फळ्यावरचेही दिसायचे नाही. त्यामुळे फळ्याचा फोटो मोबाईलवर काढून झुम करून ती बघायची. रात्री अभ्यास करताना डोळ्यांना त्रास होत असल्याने पहाटे उठून ती चार चार तास अभ्यास असल्याचे आईने सांगितले. तेजश्रीच्या वडिलांचे छोटे ज्वेलरी शॉप असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र याच सर्व परिस्थितीची जाणीव ठेवत आणि आपल्या सर्व अडचणींवर मात करत तेजश्रीने घवघवीत यश प्राप्त केले असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती नक्कीच एक आदर्श आहे. सध्या तेजश्रीवर सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून पुढे सीए होण्याचं स्वप्न आहे.
दिव्यांग अजयला 70 टक्के गुण
तर नाशिक शहरात राहणारा अजय खंदारे यास देखील कला शाखेत 70 टक्के गुण मिळाले आहेत. अजयचे कुटुंब मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आहे. वीस वर्षांपूर्वी कामासाठी नाशिकला दाखल झाले. जिथे बांधकाम सुरु असेल तिथे त्यांचे घर आहे. बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करणारे वडील आणि त्याच बांधकामाच्या ठिकाणी धुणी-भांडी करणारी आई, हे अजयचे कुटुंब आहे. शंभर टक्के अंधत्व असलेल्या अजयला लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव होती. त्यानुसार अभ्यासात सातत्य ठेवत बारावी परीक्षेत यश मिळवले आहे.