Maharashtra Heatwave : महाराष्ट्र तापला, 3 एप्रिलला अनेक जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान
3 एप्रिल रोजी राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं. सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली
मुंबई : राज्यात उष्णतेची लाट कायम असून अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. काल (3 एप्रिल) राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवण्यात आलं. तर काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर होतं. सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला (44 अंश सेल्सिअस) आणि त्यानंतर मालेगाव, चंद्रपूर (43 अंश सेल्सिअस) इथे झाली. हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.
विदर्भातील गडचिरोली वगळता अकोला, अमरावती, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं असून आवश्यकता असेल तरच दुपारी घराबाहेर पडावं, असं आवाहन हवमान विभागाकडून करण्यात आलं आहे.
रविवार 3 एप्रिल रोजी विविध ठिकाणचं तापमान
अकोला : 44.0 अंश सेल्सिअस
मालेगाव : 43.0 अंश सेल्सिअस
चंद्रपूर : 43.0 अंश सेल्सिअस
नांदेड : 41.2 अंश सेल्सिअस
सोलापूर : 41.6 अंश सेल्सिअस
परभणी : 41.4 अंश सेल्सिअस
उस्मानाबाद : 40.7 अंश सेल्सिअस
जालना : 40.8 अंश सेल्सिअस
चिखलठाणा : 40.6 अंश सेल्सिअस
पुणे : 39.8 अंश सेल्सिअस
नाशिक : 39.6 अंश सेल्सिअस
बारामती : 39.1 अंश सेल्सिअस
3 Apr, राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान आज 40 Deg च्या वर नोंदवल गेलं:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 3, 2022
सर्वात जास्त अकोला (44.0) व नंतर मालेगाव,चंद्रपुर (43.0) येथे.
Pune 39.8°C
Jalna 40.8
Nanded 41.2
Parbhani 41.4
Chikalthana 40.6
Malegaon 43
Nashik 39.6
Solapur 41.6
0sbad 40.7
Baramati 39.1
कृपया काळजी घ्या. pic.twitter.com/WFwE5UNikK
महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार : हवामान विभाग
यापूर्वी हवामान विभागाने महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार असल्याचं सांगितलं होतं."येत्या महिन्यात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे एप्रिलमध्ये अधिक तापणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात तापमान सरासरी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे," असं हवामान विभागाने म्हटलं होतं.
येत्या 4-5 दिवसात गडगडाटासह पावसाची शक्यता
दरम्यान एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना, पुढील चार ते पाच दिवसात राज्यातील काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
3 April: पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 3, 2022
- IMD pic.twitter.com/q7H0IfcY79
संबंधित बातम्या
Maharashtra Heatwave : महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज जारी