Gram Panchayat Election : पाटोद्याचे 'आदर्श' सरपंच भास्करराव पेरे पाटील का झाले रिटायर? म्हणाले...
पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. यावेळी पेरे पाटलांनी निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. आता पुढच्या पिढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे त्यांनी सांगितलं.
औरंगाबाद : गेल्या पंचवीस वर्षांत पासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. आता पुढच्या पीढीला संधी द्यायची म्हणून आपण बाजूला झाल्याचे पेरे पाटील सांगत आहेत.
बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी ABP Majha सोबत बोलताना भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, मी आपल्यापुढे, समाजापुढे काही नाही. इथं लोकशाही आहे. त्यामुळं मी फॉर्म देखील भरला नाही. मी रिटायरमेंट घेतली आहे. माझे वय 60 झाले आहे. माझ्यापेक्षा दुसरा कोणी चांगले काम करू शकतो. माझ्याकडून जेवढे गावासाठी करणे होते तेवढे केले. मीच का सरपंच व्हायचं. बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी, असं ते म्हणाले.
भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, यापुढेही कुणी माझा सल्ला घेतला तर सल्ला देण्यास मी नक्की तयार असेल. माझ्या गावचे इलेक्शन 5 हजारात होणार आहे. गावचे पुढे काय करायचे ते गावकरी ठरवतील. मला दररोज 500 किमी फिरावे लागते. असेच फिरत फिरत कलाम साहेबांसरखे जीवन सोडायचे आहे. जो खुर्चीवर बसला त्याने काय करायचे ते ठरवायचे असते. तिथं कोण बसलाय हे महत्वाचे नाही. मी कोणत्याच पक्षाला आतपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये घुसू दिले नाही, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, घरकुलासाठी 5 हजार लागत नाहीत. त्याचा टॅक्स भरावा लागतो त्याला लागतात. सरपंच घरकुल देत नाहीत, तर सरपंच फक्त कागदपत्रं पोहोचवू शकतो, असं त्यांनी सांगितलं. मी मागच्या पंचवार्षिकला ठरवले होते मला उभे राहायचे नाही. माझ्या मागे अनेक व्याप आहेत. अनेक कामे आहेत. माझी मुलगी लहाणपण पासून म्हणत होती की, तिला सरपंच व्हायचंय. तिला विचारलं तुला सरपंच व्हायचंय का? तर ती हो म्हणाली. माझ्या मुलींनी आता चांगलं काम करून दाखवावं, असंही ते म्हणाले.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द
नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली गेल्या. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी झाली. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेतली गेली. त्याचदिवशी निवडणूक चिन्ह वाटप झाली आहे. आता मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.